दिव्यांग शेतकरी तक्रारदाराचा जीवन संपवण्याचा प्रयत्न pudhari photo
बीड

Beed News : दिव्यांग शेतकरी तक्रारदाराचा जीवन संपवण्याचा प्रयत्न

धारूरमधील प्रकार; प्रशासनाच्या आश्वासनानंतर तणाव निवळला

पुढारी वृत्तसेवा

धारूर ः किल्ले धारूर येथील सर्व्हे क्रमांक 165 व 166 मधील नाला काढण्यासंदर्भात प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या प्रल्हाद भालेकर या दिव्यांग तक्रारदाराने बुधवार, 11 फेब्रुवारी रोजी सकाळी धारूर तहसील कार्यालयात जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे तहसील कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून भालेकर यांना रोखले व लेखी आश्वासन दिल्यानंतर पुढील अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, किल्ले धारूर येथील सर्व्हे क्रमांक 165 व 166 मधून वाहणारा नैसर्गिक नाला अडविण्यात आला असून, त्यावर अतिक्रमण झाल्याचा आरोप तक्रारदार प्रल्हाद भालेकर यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून तहसील प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ते मानसिक तणावाखाली होते.

प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष व दिरंगाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. प्रशासकीय चालढकल आणि समस्या प्रलंबित राहिल्यामुळे त्रस्त झालेल्या भालेकर यांनी तहसील कार्यालयात जाऊन आपल्या मागणीसाठी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे कार्यालयातील कर्मचारी व नागरिकांची मोठी धावपळ उडाली.

कर्तव्यावर असलेल्या महसूल अधिकारी व पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून भालेकर यांना ताब्यात घेतले व त्यांची समजूत काढली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तहसील प्रशासनाने सावध भूमिका घेत संबंधित सर्व्हे क्रमांकातील नाल्याचा अडथळा दूर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

लवकरच जागेची पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. या आश्वासनानंतर भालेकर यांनी आपले आंदोलन मागे घेतले. एका दिव्यांग व्यक्तीला न्याय मिळवण्यासाठी जीवन संपवण्याचा प्रयत्न करावा लागणे ही बाब चिंताजनक असून, प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT