कोळपिंपरीतील १८ शेतकऱ्यांचे सोलार, बोअरच्या मोटारींच्या वायर चोरीला  AI IMAGE
बीड

Beed | धारूर तालुक्यात वायर चोरीचे सत्र सुरूच; कोळपिंपरीतील १८ शेतकऱ्यांचे सोलार, बोअरच्या मोटारींच्या वायर चोरीला

शेतकऱ्यांमध्ये भीती; चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

धारूर : धारूर तालुक्यात शेतातील सोलार पॅनेल, विहिरीवरील मोटारी तसेच बोअरवेलच्या वायर चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील कोळपिंपरी येथे एकाच रात्री १८ शेतकऱ्यांच्या शेतातील सोलार व बोअरच्या मोटारींच्या वायर चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शेतकरी श्रीकृष्ण आप्पाराव तांबुरे यांनी धारूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, धारूर तालुक्यातील कोळपिंपरी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात सोलार पॅनेल व विहिरीवरील मोटारींसाठी वापरण्यात येणाऱ्या वायर चोरट्यांनी लंपास केल्या. दि. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेपासून दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेत श्रीकृष्ण आप्पाराव तांबुरे यांच्यासह हरिदास माधव तांबुरे, ज्ञानेश्वर भागवत तांबुरे, महादेव अभिमन्यू खुळे, योगानंद सूर्यकांत खुळे, सूर्यकांत उजेश्वर खुळे, शितल विजय थोरात, रामानंद रावसाहेब खुळे, परमेश्वर श्रीपती इंगळे, वसंत श्रीपती इंगळे, देवाशाला विजयकुमार करपे, सूर्यतारा शरद करपे, सुरेखा श्रीराम यादव, तुकाराम धोंडिबा यादव, शिवाजी जिजाभाऊ यादव, सिताराम राजाभाऊ करपे, रविंद्र राजाभाऊ करपे आणि सुमन विष्णू यादव या शेतकऱ्यांच्या शेतातील वायर चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद आहे.

चोरीस गेलेल्या वायरची एकूण किंमत ३९ हजार ४०० रुपये असल्याचे पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांचे शेतीपंप व सोलार यंत्रणा बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेतीच्या कामांवरही परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

तालुक्यात यापूर्वीही चोरीच्या घटना..

धारूर तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतातील मोटारी, केबल, सोलार पॅनेलच्या वायर तसेच विद्युत साहित्य चोरीच्या घटना यापूर्वीही घडल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, संशयितांचा शोध घ्यावा आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

प्रभारी नको कायमस्वरूपी पोलीस अधिकारी द्या

अवैध धंदेसह वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर धारूर पोलिस ठाण्यात कायमस्वरूपी पोलिस निरीक्षकाची नियुक्ती करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT