धारूर : किराणा दुकानात दररोज लागणाऱ्या साखरेच्या दरात अचानक मोठी वाढ झाली असून, गेल्या दोन दिवसांत सुमारे ५५ रुपये किलो असलेली साखर आता थेट ७० ते ७१ रुपये किलोवर पोहोचली आहे. अवघ्या दोन दिवसांत किलोमागे सुमारे १५ रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे गणित बिघडले आहे. दरम्यान, साखरेच्या दरवाढीचा थेट फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
साखर उत्पादनासाठी ऊस हा प्रमुख कच्चा माल आहे. मात्र, बाजारात साखरेच्या दरात मोठी वाढ होत असताना त्याच प्रमाणात ऊस उत्पादकांच्या उसाच्या दरात वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे साखरेच्या दरवाढीचे गणित नेमके कसे ठरते आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांच्या पदरी किती पडतो, असा प्रश्न ऊस उत्पादकांकडून उपस्थित केला जात आहे.
कारखान्यांकडून उसाला जाहीर केलेला दर पूर्णपणे आणि वेळेत मिळेलच, याची खात्री अनेकदा राहत नाही. काही कारखान्यांकडून ऊस बिल देण्यास विलंब होतो, तर काही ठिकाणी कारखान्यांच्या आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची देणी रखडल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे साखरेच्या बाजारभावात वाढ होत असताना त्याचा प्रत्यक्ष लाभ ऊस उत्पादक पर्यंत पोहोचणार का, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अवघ्या दोन दिवसांत साखरेच्या दरात किलोमागे सुमारे १५ रुपयांची वाढ होत असेल, तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाच्या दराचाही फेरविचार होणार का, असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे. साखरेच्या दरवाढीचा फायदा केवळ व्यापारी, कारखानदार आणि बाजारातील इतर घटकांपुरता मर्यादित न राहता त्यातील योग्य वाटा शेतकऱ्यांना मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.एकीकडे खते, मजुरी, मशागत, वाहतूक आणि सिंचनाचा खर्च सातत्याने वाढत आहे.
दुसरीकडे साखरेच्या दरात झालेल्या वाढीचा पुरेसा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याची भावना ऊस उत्पादकांमध्ये आहे. त्यामुळे ‘साखरेचा भाव ७० रुपयांवर पोहोचतो, मग ऊसाच्या भावात किती वाढ होणार?’ हा सवाल आता ऊस उत्पादक शेतकरी विचारात आहे. साखरेच्या दरवाढीचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार का आणि सरकार अथवा संबंधित यंत्रणा ऊसाच्या दराबाबत कोणती भूमिका घेणार, याकडे धारूर तालुक्यासह ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.
ऊस उत्पादकांना कधी मिळणार वाढ : राजेंद्र आमटे
साखरेचे भाव जय पद्धतीने बाजारात एकदम वाढले मात्र ही साखर उत्पादक करणाऱ्या उत्पादकांचे काय असा सवाल शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र आमटे यांनी विचारला असून आता कारखानदार यांनी या शेतकऱ्यांचा विचार करून त्यांना बोनस वाटप केले पाहिजे असे त्यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.