धारूर : मर्यादित शेतीक्षेत्र, वाढते खर्च आणि अनिश्चित बाजारभाव या तिहेरी आव्हानांमध्येही धारूर येथील अल्पभूधारक शेतकरी जयदत्त सर्जेराव शिनगारे यांनी नावीन्यपूर्ण प्रयोग करत यशाची नवी वाट चोखाळली आहे. सोयाबीन पीक काढल्यानंतर त्यांनी 40 गुंठे क्षेत्रात बटाटा लागवड करून समाधानकारक उत्पादन साध्य केले.
उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन पिकांची निवड, योग्य नियोजन आणि मेहनतीची जोड या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवत शिनगारे यांनी सुमारे 8 क्विंटल बियाण्यांची लागवड केली. लागवडीनंतर अवघ्या तीन महिन्यांत पीक काढणीस तयार झाले. मशागत, तणनियंत्रण, फवारणी व काढणी यासाठी एकूण सुमारे 65 हजार रुपयांचा खर्च आला.
या 40 गुंठे क्षेत्रातून अंदाजे 150 क्विंटल उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. मात्र सध्या बाजारात बटाट्याचा दर 15 रुपये प्रतिकिलो इतका घसरल्याने अपेक्षित नफ्यावर परिणाम झाला आहे. काही महिन्यांपूर्वी 30 रुपये प्रतिकिलो दर मिळत असताना उत्पादनाचे गणित अधिक फायद्याचे ठरत होते. अल्पभूधारक शेतकरी म्हणून शिनगारे यांची ही धडपड परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
कमी क्षेत्रात योग्य पीकपद्धती आणि नियोजनबद्ध शेती केल्यास उत्पादन वाढवता येते, हे त्यांनी दाखवून दिले. तज्ञांच्या मते, अशा प्रयोगशीलतेला बाजारभावाची साथ मिळाल्यास शेती अधिक फायदेशीर ठरू शकते.शेतीतील नवकल्पनांना प्रोत्साहन आणि शेतीमालाला स्थिर-हमीभावाची गरज पुन्हा एकदा या उदाहरणातून अधोरेखित झाली आहे. मेहनत, धाडस आणि नियोजन यांच्या जोरावर शिनगारे यांनी उभा केलेला हा प्रयोग ‘यशोगाथा’ म्हणूनच पाहिला जात आहे.
स्थिर भावाशिवाय शेतकऱ्यांचे गणित जुळत नाही
मी सोयाबीन काढल्यानंतर 40 गुंठे क्षेत्रात बटाट्याची लागवड केली. तीन महिन्यांत पीक तयार झाले असून उत्पादन चांगले आहे. मात्र बाजारभाव 15 रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आल्याने अपेक्षित नफा मिळत नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतीमालाला स्थिर भाव मिळणे गरजेचे आहे असे शेतकरी जयदत्त शिनगारे यांनी सांगितले.