Crime News pudhari photo
बीड

Beed Crime : उसने पैसे परत मागितल्याने तरुणाचा दगडाने खून

भावाच्या भांडणात मध्यस्थी करणे पडले महागात; मांजरकडा तांड्यावरील घटना

पुढारी वृत्तसेवा

धारूर : गाय गोठा मंजूर करून देण्यासाठी घेतलेले 20 हजार रुपये परत मागितल्याच्या वादातून भावाच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या 45 वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची संतापजनक घटना पिंपळवाडा ग्रामपंचायत अंतर्गत मांजरकडा तांडा येथे शुक्रवारी (दि. 14) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. राजाभाऊ भगवान तिडके असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी सविता तिडके यांच्या फिर्यादीवरून सचिन अशोक जाधव आणि अशोक यमाजी जाधव यांच्याविरुद्ध धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, गाय गोठा योजना मंजूर करून देण्यासाठी 20 हजार रुपये देण्यात आले होते. मात्र, योजना मंजूर न झाल्याने संबंधितांकडे पैसे परत मागण्यात आले. याच पैशांच्या व्यवहारावरून सचिन जाधव व अशोक जाधव यांच्यासोबत वाद झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

शुक्रवारी रात्री हा वाद सुरू असताना राजाभाऊ तिडके यांचा भाऊ बाबासाहेब भगवान तिडके यांच्यातील भांडण सोडवण्यासाठी राजाभाऊ घटनास्थळी गेले. यावेळी सचिन जाधव व अशोक जाधव यांनी राजाभाऊ यांच्याशी वाद घातल्याचे सांगण्यात आले. वाद विकोपाला गेल्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड मारण्यात आला. या हल्ल्यात राजाभाऊ गंभीर जखमी झाले.

जखमी राजाभाऊ यांना तातडीने धारूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेंद्र घुगे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास धारूर पोलिस करीत आहेत.

दरम्यान, आरोपींपैकी सचिन जाधव व अशोक जाधव हे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांचे नातेवाईक असल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या संबंधाची तसेच कथित पैशांच्या व्यवहाराची सत्यता पोलिस तपासातूनच स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे मांजरकडा तांडा परिसरात खळबळ उडाली असून, शासकीय योजनांच्या लाभासाठी कथित पैशांच्या व्यवहाराची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

‘योजना मंजुरीसाठी पैसे‌’च्या आरोपाची चौकशी होणार का?

गाय गोठा योजना मंजूर करून देण्यासाठी 20 हजार रुपये दिल्याचा आणि योजना मंजूर न झाल्याने ते पैसे परत मागितल्यावर वाद झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे या कथित आर्थिक व्यवहाराची सत्यता तपासणे पोलिस आणि संबंधित प्रशासनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

शासकीय योजनांचा लाभ हा पात्र लाभार्थ्यांचा हक्क आहे. अशा योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली पैशांची मागणी होत असल्यास त्याची प्रशासनाने गांभीर्याने चौकशी करण्याची गरज आहे. विहीर, घरकुल, गाय गोठा यांसारख्या योजनांच्या लाभासाठी लाभार्थ्यांकडून आर्थिक मागणी केली जाते का, याची ग्रामपंचायत स्तरावरही पडताळणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT