Beed Leopard Attack pudhari photo
बीड

Beed Leopard Attack : बिबट्यांचा मानवी वस्त्यांकडे मोर्चा; घागरवाड्यात गायीचा बळी!

बिबट्याची दहशत; वन्यजीवांच्या वाढत्या वावराने ग्रामस्थ भयभीत

पुढारी वृत्तसेवा

धारूर : धारूर तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याच्या वाढत्या वावराने पशुपालक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घागरवाडा येथे रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) दुपारी बिबट्याने शेतातील गायीवर हल्ला करून तिला ठार केले. जहागीरमोहा परिसरात बिबट्याच्या दर्शनाची घटना ताजी असतानाच घागरवाड्यात पशुधनावर हल्ला झाल्याने वन्यप्राण्यांचा मानवी वस्त्यांकडे वाढता वावर पुन्हा चर्चेत आला आहे. पाणवठे आटल्याने वन्यजीव पाण्याच्या शोधात गावशिवाराकडे येत असल्याचे वन विभागाने सांगितले असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

घागरवाडा येथील शेतकरी बन्सी पांडुरंग नाईकवाडे यांची गाय बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली. शेतशिवारात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना आणि जनावरांची देखभाल करताना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. शेतात एकटे जाणे, रात्रीच्या वेळी जनावरांची राखण करणे आणि शिवारातील कामे आटोपून घरी परतणे, या प्रत्येक बाबतीत आता भीतीची सावली निर्माण झाली आहे.

चार दिवसांपूर्वी धारूर–जहागीरमोहा परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर घागरवाड्यात गाईवर हल्ला करून बिबट्याने तिला ठार केल्याने परिसरातील गावांमध्ये भीती अधिकच वाढली आहे. एकीकडे शेतीची कामे सुरू असताना दुसरीकडे पशुधनावर होणारे हल्ले शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात भर घालत आहेत.

पाणवठे आटले; वन्यजीवांचा गावशिवाराकडे प्रवास!

बीड जिल्ह्यात सध्या डोंगराळ भाग तसेच वनक्षेत्रात बिबट्या, वाघ आणि अन्य वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे चित्र आहे. पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटत चालल्याने वन्यजीवांना जंगलात पाणी मिळणे कठीण होत आहे. परिणामी पाण्याच्या शोधात हे प्राणी मानवी वस्त्यांच्या दिशेने येत असून, अशा परिस्थितीत वन्यजीव आणि मनुष्य यांच्यात संघर्षाच्या घटना घडत असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे.वन्यप्राण्यांचा वावर वाढलेल्या भागात नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, शेतात जाताना एकट्याने जाणे टाळावे, लहान मुले आणि पशुधन सुरक्षित ठिकाणी ठेवावे, रात्रीच्या वेळी अनावश्यक बाहेर पडू नये, अशा सूचना वन विभागाकडून करण्यात येत आहेत.

पिंजरे अन् कॅमेरे लावा; केवळ सूचना नको, प्रत्यक्ष उपाय हवेत!

घागरवाडा परिसरात वन विभागाने तातडीने पाहणी करून बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घ्यावा, आवश्यक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरे लावावेत, तसेच गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वन्यजीवांचा पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन वनक्षेत्रात पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठीही उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.वन्यजीवांना पाण्यासाठी गावाकडे यावे लागू नये आणि नागरिकांना जीव मुठीत धरून शेतात जावे लागू नये, यासाठी वन विभागाने तातडीने कृती करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे आता गाव शिवारातील सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, वन विभागाच्या प्रत्यक्ष उपाययोजनांकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT