Kundalika Water Supply Scheme pudhari photo
बीड

Kundalika Water Supply Scheme : कुंडलिका पाणीपुरवठा योजनेचा बोजवारा

निकृष्ट दर्जामुळे धारूरकरांना मनस्ताप; मुख्याधिकार्‍यांनी कारवाई करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

धारूर : धारूर शहरात कुंडलिका पाणीपुरवठा योजनेअंतर्गत विविध भागांत नवीन पाइपलाइन टाकणे आणि नळजोडणीची कामे सुरू आहेत. मात्र, या कामांच्या दर्जाकडे नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता वाघ यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. परिणामी, योजनेच्या कामात अनेक त्रुटी समोर येत असून, निकृष्ट कामाचा फटका थेट नागरिकांना सहन करावा लागत आहे.

शहरातील मठगल्ली परिसरात नुकतीच नळजोडणी करण्यात आली. मात्र, कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने पंधरा दिवसांनंतर पाणीपुरवठा सुरू करताच अनेक ठिकाणी नळाचे पाइप आणि जोडण्या लिकेज झाल्या. पाइपलाइनमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रवाह सुरू झाल्याने पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला. पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाणी मिळण्याची अपेक्षा असताना पहिल्याच पाणीपुरवठ्यात गळतीच्या समस्येला सामोरे जावे लागल्याने मठ गल्लीतील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

विशेष म्हणजे, शहरात सुरू असलेल्या या महत्त्वपूर्ण पाणीपुरवठा योजनेच्या कामावर संबंधित अभियंत्यांचे नियमित लक्ष असणे अपेक्षित आहे. मात्र, अभियंता वाघ हे बीड येथूनच कामकाज पाहत असल्याने प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी देखरेखीचा अभाव निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

परिणामी, कंत्राटदारांकडून मनमानी पद्धतीने कामे केली जात असून, कामावरील सुपरवायझर - मजूर हे दादागिरी ची भाषा करत आहेत परिणामी याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.चालू असलेल्या कामाचा दर्जा तपासणारी यंत्रणा नेमकी काय करते, असा सवाल उपस्थित होत आहे. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे इंजिनियर वाघ यांच्याशी संपर्क केला आता कामानिमित्त बीडला आलेलो आहे संबंधित यंत्रणेला सांगून पाईपलाईन नळ जोडणी दुरुस्ती करून घेतली जाईल असे सांगितले.

मुख्याधिकार्‍यांनी तातडीने लक्ष घालावे!

कुंडलिका पाणीपुरवठा योजना ही शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, तिच्या कामात हलगर्जीपणा आणि निकृष्ट दर्जा खपवून घेतला जाऊ नये. मुख्याधिकार्‍यांनी मठगल्लीसह शहरातील सुरू असलेल्या सर्व कामांची प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्ता तपासणी करावी. निकृष्ट कामे करणार्‍या संबंधित कंत्राटदारांवर तसेच कर्तव्यात कसूर करणार्‍या जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करावी. उर्वरित कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित यंत्रणेला द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT