ट्रकची दुचाकीला समोरासमोर धडक pudhari photo
बीड

Dharur Accident : ट्रकची दुचाकीला समोरासमोर धडक

ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने अपघात; पिता-पुत्र गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

धारूर : अपघातांची मालिका थांबण्याचे नाव न घेणारा धारूर घाट पुन्हा एकदा रक्तरंजित झाला आहे. मंगळवार, दि. 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास भरधाव ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोरच्या धडकेत दुचाकीवरील पिता-पुत्र गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे धारूर घाट हे अपघातांचे केंद्रबिंदू ठरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

लातूरहून जालन्याकडे रेल्वेचे भंगार घेऊन जाणारा ट्रक (क्र. एमएच 18 बीजी 3288) घाटात उतरत असताना ब्रेक फेल झाल्याने अनियंत्रित झाला. याच वेळी माजलगावहून केजकडे जाणारी दुचाकी (क्र. एमएच 44 एन 8179) ट्रकच्या थेट मार्गात आली. काही क्षणांतच दोन्ही वाहनांची जोरदार समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला.या अपघातात दुचाकी चालक जनार्दन रावसाहेब चौरे (वय 40) यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, पाठीमागे बसलेले त्यांचे वडील रावसाहेब चौरे (वय 75) यांच्या डाव्या हाताला जबर मार लागला आहे.

अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील जागृत नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून म्बुलन्सद्वारे जखमींना धारूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी आंबेजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आले.सध्या या मार्गावर ऊस वाहतुकीमुळे अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू आहे.

अरुंद रस्ता, तीव्र उतार, धोकादायक वळणे आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे धारूर घाट हा जणू अपघातांचा सापळा बनला आहे. वारंवार अपघात घडत असतानाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.धारूर घाटातील तातडीने रुंदीकरण करावे, संरक्षक भिंती उभाराव्यात, धोकादायक वळणांवर बॅरिकेड्स व सूचना फलक लावावेत तसेच अवजड वाहनांसाठी स्वतंत्र वेळापत्रक लागू करावे, अशी जोरदार मागणी वाहनचालक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.रुंदीकरण कधी होणार? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. वेळीच ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर धारूर घाटातील अपघातांची मालिका थांबणार नाही, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

धारूर घाट - मृत्यूचा सापळा!

धारूर घाटात यापूर्वीही अनेक भीषण अपघात घडले आहेत.आतापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांना व गमवावा लागला, अनेक अपघातांमुळे कायमचे अपंगत्व, आठवड्यातून किमान एक गंभीर अपघात, अरुंद रस्ता, तीव्र उतार व अवजड वाहनांची जीवघेणी वर्दळ वारंवार अपघात होऊनही प्रशासनाकडून केवळ पाहणी व आश्वासनांपुरतेच काम सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT