Dharur Ghat is a death trap; is the administration blind, mute, or deaf?
धारूर : खामगाव-पंढरपूर महामार्गावरील धारूर घाट म्हणजे प्रवाशांच्या जिवाशी खेळणारा मृत्यूचा सापळाच बनला आहे. अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही, वाहने उलटत आहेत, प्रवासी जखमी होत आहेत; मात्र संबंधित प्रशासनाला जाग येत नसल्याचे चित्र आहे. अरुंद रस्ता, धोकादायक वळणे आणि काही ठिकाणी दुरवस्थेत असलेल्या संरक्षक भिंतींमुळे या घाटातून प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून जाण्यासारखे झाले आहे. वारंवार अपघात होऊनही ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार? हा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
शुक्रवारी (दि. २३ ऑक्टोबर) सकाळी धारूरमार्गे माजलगावकडे सिमेंट घेऊन जाणारा ट्रक धारूर घाटात पलटी झाला. या अपघातात ट्रकचे आणि सिमेंटचे मोठे नुकसान झाले, तर चालकाला किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने चालकाचा जीव वाचला. मात्र, या घटनेने घाटातील धोकादायक परिस्थिती पुन्हा एकदा समोर आणली आहे. आज चालक बचावला, उद्या एखाद्या निष्पाप प्रवाशाचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
धारूर घाटातील अरुंद रस्ता, तीव्र वळणे, उंच-सखल भाग आणि काही ठिकाणी संरक्षक भिंतींची झालेली दुरवस्था वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. विशेषतः अवजड वाहनांची वाहतूक होत असताना अपघाताचा धोका अधिक वाढतो. वळणांवर वाहनावरील नियंत्रण सुटल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशा परिस्थितीत रस्त्याची रुंदी वाढवणे, धोकादायक वळणांवर आवश्यक सुरक्षा उपाय करणे, संरक्षक भिंतींची दुरुस्ती करणे आणि योग्य दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे. मात्र, या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. धारूर घाटातील अपघातांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नागरिकांनी लोकप्रतिनिधींसह केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदन दिल्याचे सांगण्यात येते.
तरीही अनेक वर्षापासून हा प्रश्न कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. अपघात घडल्यानंतर घटनास्थळी धावपळ करण्यापेक्षा अपघातच होऊ नयेत, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे. धोकादायक ठिकाणे निश्चित करावीत आणि सुरक्षिततेची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे.
प्रशासनाला आणखी किती बळी हवेत ?
धारूर घाटातील अपघातांची पुनरावृत्ती हा केवळ वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेशी निगडित गंभीर विषय आहे. प्रत्येक अपघातानंतर नुकसानाची चर्चा होते; मात्र अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना वेळेत का होत नाहीत, याचे उत्तर कोण देणार? रस्त्याची दुरुस्ती, संरक्षक भिंतींचे मजबुतीकरण, धोकादायक वळणावर सुरक्षा व्यवस्था आणि स्पष्ट दिशादर्शक फलकांची कामे तातडीने होणे आवश्यक आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास प्रवाशांच्या जीवाला असलेला धोका कायम राहील. 'प्रशासन आंधळे, मुके की बहिरे?' हा नागरिकांचा सवाल आता केवळ संतापाचा उद्गार राहिलेला नसून, सुरक्षित प्रवासाच्या हक्कासाठी दिलेली जाब विचारण्याची हाक बनला आहे.