धारूर : धारूर शहरापासून जवळ असलेल्या बालाघाट डोंगर परिसरात सर्रास वृक्षतोड सुरू असून, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे डोंगराचे हिरवे आच्छादन धोक्यात आले आहे. धारूर-जहीरगिरा मार्गावरील भायगळी परिसरासह धारूर शिवारातील बालाघाट डोंगररांगेत मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
बालाघाट डोंगर हा परिसर नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाचा असून, येथे मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा आहे. मात्र, अलीकडच्या काळात काही ठिकाणी मोठमोठी झाडे तोडून त्यांची सर्रास वाहतूक केली जात असल्याचा आरोप होत आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्यासोबतच डोंगर परिसरातील वनसंपदाही कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
वन विभागाच्या हद्दीत ही वृक्षतोड सुरू असतानाही संबंधित अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. वृक्षतोडीला नेमके कोणाचे अभय आहे, असा सवालही उपस्थित होत आहे.
बालाघाट डोंगर परिसरातील वृक्षतोड तातडीने थांबवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. तसेच वन विभागाने नियमित गस्त वाढवून वनसंपत्तीचे संरक्षण करावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी व नागरिकांतून होत आहे.