Dhananjay Munde Political Comeback Pudhari
बीड

Dhananjay Munde: धनंजय मुंडे पुन्हा मैदानात उतरणार? ‘कमबॅक’च्या पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; व्हिडिओ होतोय व्हायरल

Dhananjay Munde Political Comeback: धनंजय मुंडे यांच्या जीममधील नव्या व्हिडीओसोबतच्या सूचक पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Rahul Shelke

Dhananjay Munde Political Comeback: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे गेल्या काही काळापासून सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर असल्याचे चित्र आहे. अशातच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून समोर आलेल्या एका नव्या पोस्टने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. जीममध्ये व्यायाम करतानाचा व्हिडीओ शेअर करताना मुंडे यांनी लिहिलेल्या कवितेच्या ओळींमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

धनंजय मुंडे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये ते जीममध्ये व्यायाम करताना दिसत असून, गेल्या काही काळात त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेला बदलही प्रकर्षाने जाणवतो. राजकीय घडामोडींपासून काहीसे अंतर राखत असताना त्यांनी आरोग्य आणि फिटनेसवर लक्ष केंद्रित केल्याचे या पोस्टमधून दिसून येते.

मात्र, या व्हिडीओपेक्षा त्यासोबत लिहिलेले कॅप्शन अधिक चर्चेचा विषय ठरत आहेत. मुंडे यांनी आपल्या मनातील संघर्ष आणि कठीण काळाचे चित्रण करणाऱ्या काही ओळी लिहिल्या आहेत.

‘काटे खोलवर रुतले आहेत,तरी पाऊल पुढे टाकतो आहे…भेगाळलेले पाय आणि घायाळ मन;अजूनही धैर्य टिकवून आहे…’

पुढे ते म्हणतात,

‘निंदा-दूषणे आता न भिडती,अडखळत मार्ग काढतोच आहे…हरवण्याची आता बिशाद कुणाची…स्वतःशी सुद्धा लढतो आहे…’

या कवितेच्या माध्यमातून मुंडे यांनी कठीण परिस्थितीतही आपण खचलेलो नसल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे पोस्टच्या अखेरीस त्यांनी ‘Tough times don’t last, and no force can stop a determined mind. A stronger comeback is on the way!’ असे लिहिले आहे. त्यामुळे त्यांच्या या पोस्टचा संबंध आगामी राजकीय पुनरागमनाशी जोडला जात आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राजकीय संकट

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे मोठ्या राजकीय वादात सापडले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव चर्चेत आल्यानंतर मुंडे यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका झाली.

या राजकीय दबावाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळणार का, याबाबत वेळोवेळी चर्चा रंगली. मात्र, अद्याप त्यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाबाबत ठोस निर्णय झालेला नाही.

राजकीय कमबॅकचे संकेत, पण अडथळे कायम

काही दिवसांपासून धनंजय मुंडे पुन्हा सक्रिय राजकारणात परतण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत होते. मात्र, बीड दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पत्रकारपरिषदेत सुनेत्रा पवारांनाच बोलू दिलं नाही, त्यांना मध्येच थांबवत त्यांनी हस्तक्षेप केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही मुंडे यांना अप्रत्यक्षपणे समज दिली होती.

या पार्श्वभूमीवर मुंडे यांची सध्याची सोशल मीडिया पोस्ट महत्त्वाची मानली जात आहे. ‘निंदा-दूषणे आता न भिडती’, ‘अजूनही धैर्य टिकवून आहे’ आणि ‘स्वतःशी सुद्धा लढतो आहे’ या ओळींमधून त्यांनी टीका, अडचणी आणि राजकीय आव्हानांनंतरही आपली लढण्याची तयारी कायम असल्याचा संदेश दिला आहे का, याबाबत आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT