Dhananjay Munde's criticism of Manoj Jarange
बीड : पुढारी वृत्तसेवा
आमच्या अंगावर आला तर शिंगावर घेण्याची आमची तयारी आहे. आमच्या नादाला लागू नका, असा गर्भित इशारा देत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, न्यायहक्कासाठी हा महाएल्गार मेळावा आयोजित केला असून, या आंदोलनकर्त्यांनी माणसात माणूस ठेवला नाही. गावागावांत जातीचे विष पेरले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यात एवढे जाती-जातीमध्ये विष पेरणे हे कितपत योग्य आहे.
आपण सर्वजण आता या लढ्यासाठी छगन भुजबळ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायाचे आहे. ओबीसी समाजावर सध्या अन्याय होत असून, काही आंदोलनकर्ते माथी भडकविण्याचे काम दररोज सकाळी हॉस्पिटलमधून बसून करत आहेत.
मराठा समाजाच्या तरुण-तरुणींना माझी विनंती आहे की, त्यांनी इडब्ल्यूएसचा लाभ घ्यावा. आज ही आरक्षणाची लढाई आम्ही लढत असून, मागील २५ वर्षांपासून मी मराठा समाजाच्या या लढाईमध्ये आहे. मात्र आमच्या ताटातील जर तुम्ही घेणार असाल तर ते आम्ही होऊ देणार नाही, आमच्या अंगावर आला तर शिंगावर घेण्याची आमची तयारी आहे. आमच्या नादाला लागू नका. आपला फक्त एका व्यक्तीच्याविरुद्ध लढा आहे,
समाजच्याविरुद्ध नाही हे लक्षात ठेवा. उद्या गावगाडा आपल्याला चालवायचा आहे. यांच्यासारख्या भामट्यांच्या नादी लागू नका, असे त्यांनी यावेळी सांगितले.