Dhananjay Munde: Gautam Bapu opened schools for the poor without taking up a position in politics
परळी पुढारी वृत्तसेवा : गौतम बापू नागरगोजे आणि मुंडे परिवाराचे दोन पिढ्यांपासूनचे आगळे वेगळे आहेत. राजकारणामध्ये बापूंनी खूप मोठे योगदान असून, त्या काळात राजकारणात त्यांना पद मिळू शकत होते, पण बापूंनी स्वतःसाठी पद न घेता गोरगरिबांच्या शिक्षणासाठी शाळा घेतल्या आणि या भागात शिक्षणाचे दरवाजे उघडले, असे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी काढले.
इंद्रायणी प्रतिष्ठान व सरस्वती नागरगोजे प्रतिष्ठान यांच्या वतीने शिक्षणमहर्षी गौतमबापू नागरगोजे व स्व. शिवशलामाई गौतमराव नागरगोजे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील जिजामाता विद्यालयात आयोजित प्रेरणादायी सोहळ्याच्या सांगता प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मराठी सिने अभिनेते संदीप पाठक, धर्मापुरीचे सरपंच अॅड. गोविंदराव फड, संस्थेचे सचिव विजयकुमार नागरगोजे, संचालिका डॉ. सरस्वती नागरगोजे, प्राचार्य रामहरी गित्ते, ग्रामपंचायत सदस्य फुलचंद फड, कैलास वाघमारे, प्रवीण फड यांच्यासह इतर मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
गौतम बापूंच्या शाळांमधून शिक्षण घेऊन असंख्य विद्यार्थी मोठ्या पदावर चांगले जीवन जगत आहेत. ही गौतम बापूंची खरी कमाई आहे, असे सांगून आ. धनंजय मुंडे म्हणाले, मातीचे ऋण फेडण्यासाठी पद घेऊन ऋण न फेडता मातीतल्या माणसांना मोठं करून ते ऋण फेडायचे असतात. ही गौतम बापूंची शिकवण आहे. गौतम बापूंनी राजकारणामध्ये अनेक वेळा मार्गदर्शन केले. त्यातून मार्ग सापडला आणि यश मिळाले. बापूंच्या शाळातून अनेक चांगले विद्यार्थी घडले आहेत, घडत आहेत.
भविष्य काळामध्ये सर्व शाळांना मदत करण्याची तयारी असल्याची ग्वाही त्यांनी दिली. सचिव विजयकुमार नागरगोजे, संचालिका डॉ. सरस्वती नागरगोजे, प्राचार्य रामहरी गित्ते यांनी केलेल्या आयोजनाबद्दल व कार्याबद्दल कौतुक केले. यावेळी मराठी सिनेअभिनेते संदीप पाठक यांनी व-हाड निघालं लंडनला हे एक पात्र नाटक सादर केले आणि प्रेक्षकांमध्ये हास्यकल्लोळाची लाट उसळी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक एम. के. मुंडे, आर. बी. फड व शिवाजी गित्ते यांनी केले.