मस्साजोग, बीड : पुढारी वृत्तसेवा
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा द्या, त्यांना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले होते. यावेळी ग्रामस्थांनीही पाण्याच्या टाकीला घेराव घातला होता. पोलिस प्रशासन आपल्याला या प्रकरणाची नीट माहिती देत नाही. माझा पोलिसांवर विश्वास नाही म्हणत धनंजय देशमुख यांनी जीवन संपवण्याचा प्रशासनाला इशारा दिला होता. यावेळी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारीही आंदोलन स्थळी दाखल झाले होते. दरम्यान जरांगे पाटील यांनी फोनवरून धनंजय देशमुखांशी संवाद साधला यानंतर धनंजय देशमुख यांची मनधरणी करण्यात त्यांना यश आले आणि देशमुख पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले.
जरांगेंच्या मनधरणीनंतर देशमुखांनी आंदोलन मागे घेतले आहे. टाकीवरून खाली उतरल्यावर देशमुख भावूक झाले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखने आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे. तीने आरोपी जर सापडत नसतील तर आम्हाला जगून काय उपयोग असा उपरोधिक सवाल उपस्थित केला आहे. तसेच पोलिसांनी तपासाची माहिती द्यावी अशी वैभवी देशमुखने मागणी केली आहे.