परळी वैजनाथ येथील महापशुधन एक्स्पोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध उपक्रमांचे उद्घाटन केले.  Pudhari
बीड

Devendra Fadnavis | माय अन् माती हेच आमचं व्हॅलेंटाईन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Beed News | ‘वैरण विकास कार्यक्रम’ व पशुसंवर्धनातील नवोपक्रमांना चालना देणार

पुढारी वृत्तसेवा

Parli Vaijnath Maha Pashudhan Expo 2026

परळी वैजनाथ : परळी वैजनाथ येथे आयोजित देश पातळीवरील महापशुधन एक्स्पोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.१४) भेट देऊन विविध उपक्रमांचे उद्घाटन केले. कार्यक्रमानुसार ते १५ फेब्रुवारी रोजी समारोपासाठी येणार होते; मात्र इतर नियोजित कार्यक्रमांमुळे त्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी उपस्थिती लावली. यावेळी भाषणात “माय आणि माती हेच आमचं व्हॅलेंटाईन” असे सांगत शेती, पशुसंवर्धन आणि ग्रामीण विकासाशी असलेली बांधिलकी त्यांनी अधोरेखित केली.

१३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान आयोजित या तीन दिवसीय महापशुधन एक्स्पोला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी विविध स्टॉल्सना भेट देत पशुपालनातील नवे प्रयोग व तंत्रज्ञानाची पाहणी केली. महापशुधन एक्स्पो २०२६ अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) मधील पात्र महिला बचत गटांना कर्जवाटप करण्यात आले. ‘उमेद सखी महिला शेतकरी उत्पादक कंपनी’ला स्मार्ट प्रकल्पांतर्गत १२ लाख २७ हजार ५०० रुपयांच्या अनुदानाच्या पहिल्या हप्त्याचे वितरणही त्यांच्या हस्ते झाले.

यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या ‘महापशुधन वार्ता’ या मासिकाच्या दहाव्या अंकाचे तसेच दिनदर्शिका २०२६ चे प्रकाशन करण्यात आले. परळी वैजनाथ येथील डॉ. भालचंद्र सार्वजनिक वाचनालयाचे ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. तसेच भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा, पुणे यांच्या फिरत्या प्रयोगशाळेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पशुसंवर्धन मंत्री Pankaja Munde यांच्या हस्ते झाला. पशुप्रदर्शनातील विविध स्पर्धांतील विजेत्या पशुपालकांना बक्षिसांचे वितरणही करण्यात आले.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्य सरकार शेती व शेतीपूरक व्यवसायांसाठी ठामपणे उभे आहे. आपले नाते माय आणि मातीशी घट्ट असून त्याच भावनेतून सरकार काम करत आहे. नैसर्गिक शेती, पशुसंवर्धन, दुग्धवाढ, संशोधन आणि रोजगारनिर्मिती यांना चालना देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. मराठवाडा, विदर्भासह राज्यातील सर्व भागांत पशुसंवर्धन विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यात येतील.

येत्या काळात ‘वैरण विकास कार्यक्रम’ हाती घेऊन चाऱ्याची उपलब्धता वाढवण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापशुधन एक्स्पोच्या माध्यमातून पशुपालकांनी नव्या संकल्पना, आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित जातींची माहिती आत्मसात करावी, यातूनच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT