बीड : मी येथे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून नाही, तर संत वामनभाऊ महाराजांचा एक भक्त आणि गहिनीनाथ गडाचा सेवक म्हणून आलो आहे. महंत विठ्ठल महाराजांनी मला निमंत्रणही त्याच अधिकाराने दिले होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संत वामनभाऊ महाराज यांचे विचार आजही समाजाला दिशा देण्याचे काम करत असून, त्यांचे कार्य पिढ्यानपिढ्या मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे संत वामनभाऊ महाराज यांच्या 50 व्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गडाचे महंत विठ्ठल महाराज, राज्याच्या ग्रामविकास व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आ. सुरेश धस, आ. मोनिका राजळे, आ. भीमराव धोंडे, माजी आमदार जयदत्त क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, विक्रमानंद शास्त्री, स्वामी विश्वेश्वरानंदजी महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, नाथ परंपरेतील महान संत आणि साक्षात शंकराचा अवतार मानले जाणारे संत वामनभाऊ महाराज हे समाजाला दिशा देणारे सद्गुरू होते. त्यांनी दरऱ्या-खोऱ्यांतून प्रवास करत भागवत पंथाचा प्रचार केला आणि समाजात एकोप्याचा संदेश दिला. मन शुद्ध असेल तर आचरण शुद्ध होते, हा विचार त्यांनी समाजमनात रुजवला. त्यांच्या उपदेशामुळे अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक चोरी सोडून माळकरी झाले,
ही त्यांची अलौकिक किमया होती. संत वामनभाऊ महाराजांना वाचासिद्धी प्राप्त होती. त्यांच्या कीर्तनातून आणि विचारांतून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत अध्यात्म पोहोचले. काळ बदलला तरी त्यांचे कीर्तन, नामस्मरण आणि उपदेश आजही तितकेच सुसंगत आणि महत्त्वाचे आहेत. गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातून विविध कामे हाती घेण्यात आली असून, ती टप्प्याटप्प्याने पूर्ण होत आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
गडावरील महाप्रसादाच्या परंपरेचे मुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, जिथे-जिथे सप्ताह होतो, तिथे भाविकांसाठी पोटभर जेवणाची व्यवस्था केली जाते. पुढील सप्ताहासाठी विविध गावांतून अन्न्नदानाची मागणी होणे, ही वामनभाऊ महाराजांच्या कृपेची साक्ष आहे.
पंढरपुरात जागा, पालखी मार्गाचा विकास
पंढरपूर येथे गडासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, पालखी मार्गाच्या विकासाचे कामही लवकरच हाती घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. गहिनीनाथ गडाच्या सर्व विकासकामांची जबाबदारी लोकप्रतिनिधींसह मिळून एक अनुयायी म्हणून पार पाडेन. तसेच दरवर्षी संधी मिळेल तेव्हा गडावर येऊन महाराजांचा आशीर्वाद घेत राहीन, अशी ग्वाहीही दिली.
कष्टकरी समाज भाऊंना विसरला नाही : पंकजा मुंडे
यावेळी बोलताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, संत वामनभाऊ महाराजांनी कठीण काळात माणसाला माणूस बनवण्याचे संस्कार दिले. सत्य, एकोपा आणि सेवाभावाचे हे संस्कार आजही महाराष्ट्रभर जिवंत आहेत. कष्टकरी, गरीब आणि वंचित समाज वामनभाऊ महाराजांचे विचार कधीही विसरलेला नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून गडाच्या विकासाला भव्य स्वरूप मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.