सासऱ्याच्या प्रेमविवाहाची सुनेला शिक्षा; ७ पिढ्या समाजातून बहिष्कृत file photo
बीड

सासऱ्याच्या प्रेमविवाहाची सुनेला शिक्षा; ७ पिढ्या समाजातून बहिष्कृत

पुढारी वृत्तसेवा

आष्टी : सासऱ्याने समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केल्यामुळे त्याला अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला. त्यांनी तो न भरल्याने सुनेसह मुलाला जातपंचायतीमध्ये बोलावले. त्यांनीही असमर्थता दर्शविल्याने पंचांनी या कुटुंबाला सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला. तसेच, पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारू, अशा धमक्याही दिल्या. हा प्रकार २२ सप्टेंबर रोजी आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे घडला.

हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, अखेर ९ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा जातपंचायतीच्या प्रभावाचा मुद्दा समोर आल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. मालन फुलमाळी असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. मालन यांचे सासरे नरसू फुलमाळी यांनी समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला होता. यासंदर्भात जातपंचायत बसविण्यात आली. जातपंचायतीने नरसू फुलमाळी यांना अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला. अनेक वर्षे उलटल्यानंतरही त्यांनी हा दंड भरला नाही. त्यामुळे पंचायतीने संपूर्ण कुटुंबालाच सात पिढ्यांसाठी समाजातून बहिष्कृत करण्याचे फर्मान जारी केले. जातपंचायतीच्या या कठोर निर्णयामुळे हतबल झालेल्या मालन यांनी अखेर फिर्याद नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी एकूण नऊजणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT