बीड : बीड शहर पोलिस ठाणे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच पोलिस ठाण्याच्या कोठडीत आहे. त्याला या ठिकाणी आणल्यानंतर लागलीच दुसर्या दिवशी पोलिस ठाण्याच्या आवारात पाच कॉट ठेवण्यात आले होते. यामुळे राज्यभरातील अनेक नेत्यांनी याबाबत संशय व्यक्त केला होता. यावर आता पोलिस अधिकार्यांनी स्पष्टीकरण देत हे कॉट कर्मचार्यांसाठी आणल्याचे सांगितले.
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी काही काळ बीड शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत होते. त्यांना या ठिकाणाहून गेवराई येथील पोलिस ठाण्याच्या कोठडीत हलवण्यात आलेले आहे. तर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड हा बीड शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत आहे. या ठिकाणी वाल्मीक कराड दाखल झाल्यानंतर दुसर्या दिवशी एका पोलिस वाहनातून पाच कॉट पोलिस स्टेशन आवारात आणण्यात आले. त्या ठिकाणी ते बाहेरच उतरवुन ठेवण्यात आले.
या प्रकाराची जोरदार चर्चा झाल्यानंतर अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर यांनी याबाबतची माहिती दिली. शहर पोलिस ठाण्याची इमारत नवीन असून त्या ठिकाणी अद्याप कर्मचार्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. पोलिस अधिक्षक नवनवीत कावत यांनी भेट दिल्यानंतर कर्मचार्यांना त्यांनी काही अडचणी आहेत का, असे विचारले असता या ठिकाणी विश्रांतीसाठी कोणतीही सोय नसल्याचे कर्मचार्यांनी सांगितले होते. त्यानंतर कावत यांनी संबंधीत अधिकार्यांना कळवत कॉट उपलब्ध करुन दिले. परंतु या ठिकाणी आणलेले कॉट हे कोणासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. याबाबत काही नेत्यांनी संशयही व्यक्त केला. याबाबत अपर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर यांनी हे कॉट कर्मचार्यांसाठीच असल्याचे स्पष्ट केल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.