शिवनाथ जाधव
टाकरवण : माजलगाव तालुक्यातील टाकरवण गावासाठी केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या तब्बल ४ कोटी ६० लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अद्याप अपूर्णच असून, ग्रामस्थांना आजही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मोठा निधी खर्चूनही गावकऱ्यांना पाणी न मिळाल्याने संताप व्यक्त होत आहे.
टाकरवण हे तालुक्यातील महत्त्वाचे गाव असले तरी रस्ता व पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांपासून गाव वंचित राहिले आहे. दरवर्षी फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईची झळ बसत असल्याने ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर जलजीवन मिशन अंतर्गत गावासह वाडी, वस्ती व तांड्यांसाठी निधी मंजूर झाला. मे २०२३ मध्ये गोदावरी पात्रात विहीर खोदण्याचे काम सुरू झाले.
त्यानंतर नोव्हेंबरमध्ये साठवण टाकी व जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. गावातील रस्ते खोदून जलवाहिनी टाकण्यात आली. मात्र, दोन वर्षे उलटूनही योजना पूर्णत्वास गेलेली नाही. मार्च अखेरपर्यंत पाणीपुरवठा सुरू होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. पण ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे काम रखडल्याचा आरोप होत आहे. यामुळे जलजीवन मिशनचे पाणी नक्की कुठे मुरते आहे? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
पूर्वीची योजना ठरली होती निष्फळ
सन १९८६-८७ मध्ये जलनिस्सारण विभागातर्फे गावासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. त्यावेळी जलकुंभ व जलवाहिनीचे काम झाले; मात्र तांत्रिक त्रुटींमुळे गावाला एक वर्षही नियमित पाणी मिळाले नाही. त्यानंतर ही योजना धूळखात पडली. गेल्या ३५ वर्षांपासून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आता नव्या योजनेचीही तीच अवस्था होत असल्याने नाराजी वाढली आहे.
ग्रामस्थांचा इशारा; प्रशासनाचे स्पष्टीकरण
चार कोटी ६० लाख रुपये खर्च करूनही योजना अपूर्ण आहे. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कामही निकृष्ट झाले आहे. प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून योजना पूर्ण करावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थ कपिल अडागळे यांनी दिला. जलजीवन मिशनचे अभियंता ओमकार बीडकर यांनी सांगितले की, गुत्तेदारास वेळोवेळी लेखी पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. तर गुत्तेदार जालिंदर डाबकर यांनी दावा केला की, काम १०० टक्के पूर्ण झाले असून वीजपुरवठ्याच्या अडचणींमुळे सध्या पाणीपुरवठा सुरू होऊ शकलेला नाही. दरम्यान, सरपंच सुनील तौर यांनी काम संथ गतीने सुरू असल्याची तक्रार करत, हे काम तातडीने पूर्ण व्हावे यासाठी आमदार विजयसिंह पंडित यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे. एकीकडे कोट्यवधींचा निधी खर्च झाला, तर दुसरीकडे महिलांच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा अद्याप उतरलेला नाही- यामुळे टाकरवणमधील जलजीवन योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.