गेवराई : गेवराई शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नुकताच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा शिवप्रेमींच्या पुढाकारातून उभारण्यात आला. रात्रीच्या वेळी गनिमी काव्याच्या पद्धतीने पुतळ्याची स्थापना व अनावरण करण्यात आल्याने शहरात अभिमान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला होता.
मात्र पुतळा उभारण्यात आलेले ठिकाण राज्य महामार्गाच्या मध्यभागी येत असल्याचे कारण पुढे करत नगरपरिषद प्रशासनाने तो अन्यत्र हलविण्याचा प्रस्ताव मांडला आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली आहे. यासाठी शिवप्रेमींशी चर्चा व बैठका घेऊन समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, पुतळा हलविण्याच्या चर्चेमुळे शिवप्रेमींमध्ये अस्वस्थता वाढली असून निर्णयाला तीव्र विरोध होत आहे. आज मोठ्या संख्येने शिवप्रेमी चौकात एकत्र जमले आणि तेथून नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढला. प्रशासनाच्या भूमिका विर-ोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपतींचा पुतळा ज्या ठिकाणी बसविला आहे, तो तिथेच राहिला पाहिजे; हलविण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा ठाम पवित्रा आंदोलकांनी घेतला.
या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत सर्वानुमते तोडगा काढण्यास प्रशासन सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुतळा त्याच ठिकाणी ठेवण्यासाठी आवश्यक तांत्रिक व वाहतूक व्यवस्थेचा पर्याय तपासला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
सध्या या विषयावर शहरात विविध स्तरांवर चर्चा सुरू असून प्रशासन आणि शिवप्रेमी यांच्यातील पुढील बैठकीत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण गेवराईकरांचे लक्ष लागले आहे.