'Charlie Chaplin' takes to the streets to raise voter awareness
गेवराई पुढारी वृत्तसेवा : आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का १०० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी गेवराई येथे आज अत्यंत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली. नगरपरिषद कार्यालयाच्या वतीने ज्युनिअर चार्ली फाउंडेशन आणि सु-लक्ष्मी सेवाभावी संस्था यांच्या सहकायनि छत्रपती संभाजीनगरचे ज्युनिअर चार्ली समाजसेवक सुमित पंडित यांनी चार्ली चॅप्लिनच्या अचूक वेशभूषेतून दिवसभर मुक अभिनय सादर करत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.
सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळपर्यंत गेवराई शहरातील तहसीलदार कार्यालय, बस स्थानक, पंचायत समिती, नगरपरिषद कार्यालय, मुख्य बाजारपेठ, पोलिस स्टेशन अशा विविध ठिकाणी त्यांनी चार्ली चॅप्लिनच्या खास शैलीतून मतदारांशी संवाद साधला. काहीही करा, पण मतदान चुकवू नका सुट्टी आहे म्हणून गावाला जाऊ नका बाहेरगावी असलात तरी मतदानासाठी या अशा हावभावातून त्यांनी नागरिकांना विनंती केली. त्यांच्या अभिनयाला गेवराईकरांनी मोठा प्रतिसाद दिला.
सुमित पंडित आणि त्यांच्या टीमकडून राज्यभर मतदान, पोलिओ, रस्ते सुरक्षा आणि विविध सामाजिक विषयांवरील जनजागृती चार्ली चॅप्लिनच्या प्रतीकात्मक भूमिकेतून करण्यात येते. या फाउंडेशनने राज्यात तब्बल ३१ ज्युनिअर चार्ली तयार केले असून ते सतत समाजप्रबोधनाची मोहीम राबवित आहेत. उपक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन आणि निवडणूक निर्णय अधिकारी संदीप खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या मोहिमेसाठी मुख्याधिकारी विक्रम मांडुरके, नायब तहसीलदार संजय सोनवणे यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला निरीक्षण अधिकारी गजानन मोरे, पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ, तसेच दीपक लंके, सतीश कोतकर, अण्णासाहेब पवार, सुश्री संध्या थोरात, श्री प्रकाश रानमारे, नगरपालिका कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावने व सुमित पंडित यांच्या या उपक्रमाचे सर्वदूर कौतुक होत आहे.