बालरथ चालक, मदतनीसांना पोलिस पडताळणी अनिवार्य file photo
बीड

School Bus : स्कूलबसमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य

नियम मोडणाऱ्यांवर परवाना रद्दची कारवाई; बीड आरटीओचे शाळा, शिक्षण विभाग व बसचालकांना आदेश

पुढारी वृत्तसेवा

CCTV mandatory in school buses

बीड, पुढारी वृत्तसेवा : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा देत बीड प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) जिल्ह्यातील सर्व स्कूलबसमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे अनिवार्य केले आहे. तसेच आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या बसचालक व मालकांवर थेट परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात शिक्षण विभाग, शाळा व्यवस्थापन तसेच स्कूलबस चालक-मालकांना आदेश जारी करण्यात आले आहेत.

नुकत्याच बीड शहरात एका शालेय बसमधून विद्यार्थिनी उतरत असताना घडलेल्या अपघाताची घटना आरटीओने अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. सुदैवाने विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाली नसली, तरी अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी जिल्हाभरातील सर्व स्कूलबसची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एआरटीओ बालाजी धन्वे यांनी 'दैनिक पुढारी'शी बोलताना सांगितले की, जिल्ह्यातील सर्व स्कूलबसची नियमित तसेच अचानक तपासणी केली जात आहे.

बसमध्ये तांत्रिक त्रुटी, सुरक्षा नियमांचे उल्लंघन किंवा आवश्यक सुविधा नसल्याचे आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाणार आहे. आरटीओने जारी केलेल्या सूचनांनुसार प्रत्येक स्कूलबसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशमन यंत्र, आपत्कालीन बाहेर पडण्याची व्यवस्था, प्रथमोपचार पेटी तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व सुविधा असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

बसची तांत्रिक स्थिती सुस्थितीत असावी, तसेच शासनाच्या नियमानुसार चालकासह आवश्यक कर्मचारी उपलब्ध असणेही अनिवार्य करण्यात आले आहे. आरटीओने शिक्षण विभागालाही या मोहिमेत सहभागी करून घेतले असून, शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत अधिक दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षा निकषांचे पालन न करणाऱ्या बस रस्त्यावर उतरू दिल्या जाणार नाहीत, असा इशाराही देण्यात आला आहे. यंदा आरटीओने स्कूलबस सुरक्षेबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतल्याने पालकवर्गातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

"सीसीटीव्हीसह सुरक्षा व्यवस्था अनिवार्य : एआरटीओ धन्वे

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रत्येक स्कूलबसमध्ये सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्र, आपत्कालीन सुविधा आणि शासनाने निर्धारित केलेले सर्व सुरक्षा निकष अनिवार्य आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या बसचालक व मालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. यासाठी शिक्षण विभागाच्या समन्वयाने शाळा आणि परिवहन व्यवस्थेबाबत विशेष जनजागृती व तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे बालाजी धन्वे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, बीड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT