CBI Interrogates Brother and Sister in Ambajogai
अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा नीट यूजी प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी सीबीआय अंबाजोगाईपर्यंत पोहचली असून, गुरुवारी दुपारी शहरातील बहिणभावाची व एका पालकाची चौकशी करण्यात आली. सीबीआयने त्यांचे मोबाईल, सिमकार्ड व इतर महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
नीटची तयारी करण्यासाठी हे दोन विद्यार्थी लातुरात राहत होते. पथक सकाळी अंबाजोगाई शहरात दाखल झाले. शहरातील स्थानिक पोलिसांनाही फारशी भणक लागू न देता सीबीआयने थेट संशयित विद्यार्थ्यांचा शोध घेत कारवाई सुरू केली. या पथकाने दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन एका अज्ञात ठिकाणी त्यांची दोन तास कसून चौकशी केली.
चौकशी दरम्यान तपास यंत्रणेने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत दोन्ही विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन आणि कार्ड आपल्या ताब्यात घेतले आहेत. या दोन्ही संशयित विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच गैरमार्गान किंवा आर्थिक देवाणघेवाण करून निटचा पेपर मिळवला असल्याचा दाट संशय सीबीआयला आहे. ताब्यात घेतलेल्या मोबाईल आणि मेमरी कार्डमधील डिजिटल डेटा, चॅट्स आणि कॉल्सच्या माध्यमातून या संशयाची शहानिशा केली जात आहे.
आई शिक्षिका असल्याचे निष्पन्न
अंबाजोगाईमध्ये सीबीआयने चौकशी केलेले विद्यार्थी हे बहिणभाऊ असल्याची माहिती आहे. यातील बहिणीने नीट परीक्षा रिपीट केली आहे. त्यांची आई शिक्षिका असून त्यांची देखील चौकशी करण्यात आली असल्याची माहिती आहे. सीबीआयच्या पथकाने अत्यंत गुप्तपणे ही सगळी कारवाई केली. यासाठी स्थानिकच्या एका शासकीय कर्मचाऱ्याची देखील सीबीआयने मदत घेतल्याची माहिती समोर आली आहे.
लातूरमधील डॉ. शिरुरे सीबीआयच्या ताब्यात
लातूर, पुढारी वृतसेवा : नीट पेपर फुटीप्रकरणी चौकशीसाठी सीबीआय पथकाचा मुक्काम लातुरातच असून गुरुवारी (दि.२१) पथकाने औसा रोड येथे असलेल्या बालरोगतज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांच्या घराची दीड तास तपासणी केली. डॉ. मनोज शिरुरे यांना सीबीआयने पुणे येथून ताब्यात घेतले आहे. दरम्यान या प्रकरणात अजूनही कांही डॉक्टर्स सीबीआयच्या रडावर असून त्यांची कधीही चौकशी होऊ शकते, असे समजते. प्रा. पी. व्ही. कुलकर्णी, शिवराज मोटेगावर व डॉ. मनोज शिरुरे या लातुरातील तिघांना अटक झाल्यानंतर शहरातच या प्रकरणाच्या पाळामुळांचा विस्तार अधिक झाल्याची शंका सीबीआयला असून आहे. डॉ. मनोज शिरुरे व प्रा. पी.व्ही. कुलकर्णी यांचा संपर्क होता व कुलकर्णीच्या माध्यमातून शिरुरे यांनी त्यांच्या परिचीतांच्या पाल्यांना नीटचे प्रश्न उपलब्ध करुन दिले होते. विशेष म्हणजे कुलकर्णी यांचा या विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवादही झाला होता अशा चर्चा आहेत.
तलवारीसह तरुण अटकेत
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: गागलेगाव फाटा (ता. बिलोली) येथे लोखंडी तलवार बाळगून फिरणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाला रामतीर्थ पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. अमृत शिवाजी बोगरे (रा. खपराला, ता. बिलोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस कॉन्स्टेबल अशोक यरपालवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.