Cannabis cultivation in a sugarcane field
धारूर, पुढारी वृत्तसेवा : धारूर तालुक्यातील काटेवाडी शिवारात ऊसाच्या शेतामध्ये बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर धारूर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 19 लाख 49 हजार 440 रुपये किमतीचा गांजा जप्त केला. या प्रकरणी शेतमालकाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलेल्या पोलिसांनी माहितीनुसार, 28 जुलै रोजी रात्री काटेवाडी येथील गट क्रमांक 37 मधील ऊसाच्या शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार धारूर पोलिसांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह छापा टाकला.
या कारवाईत तुकाराम दत्तात्रय गोरे (रा. काटेवाडी) यांच्या शेतातून हिरवी पाने, फुले, बोंडे, खोड, कळ्यांसह मातीसकट उपटलेली गांजाची झाडे जप्त करण्यात आली. जप्त गांजाचे एकूण वजन 97 किलो 472 ग्रॅम असून त्याची अंदाजे बाजार किंमत 19.49 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात आरोपीने कोणताही वैध परवाना न घेता आर्थिक फायद्यासाठी ऊसाच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच हा गांजा स्वतःच्या सेवनासह विक्रीच्या उद्देशाने पिकविण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी 29 जुलै रोजी पहाटे धारूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अधिनियम, 1985 अंतर्गत कलम 20 व 20 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ही कारवाई अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घुगे, पोलीस उपनिरीक्षक मुकुंद ढाकणे, नायब तहसीलदार सुरेश पाळवदे तसेच धारूर पोलीस व महसूल विभागाच्या पथकाने संयुक्तरीत्या केली.