Campaign against sand mafia in Shirur, Dindrud
बीड, पुढारी वृत्तसेवा: अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोहीम सुरु केली आहे. यामध्ये दिंद्रुडमध्ये दोन ठिकाणी कारवाई करत वाळू व दोन वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर शिरुर पोलिसांनीही कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा मुद्देमाल जप्त केला.
मंगळवारी दिंद्रुड पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात करण्यात आलेल्या सलग कारवाईत दोन वाहने आणि अडीच ब्रास वाळू असा एकूण १२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही घटनांमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल करून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
दिंद्रुड जवळ आनंदगाव-लोनगाव रोडवर पांढऱ्या रंगाच्या क्रमांक नसलेल्या पिकअप वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यात जितीन राजेभाऊ पौळ (वय ३२, रा. खरात आडगाव) हा अवैधरित्या एक ब्रास वाळू वाहतूक करताना आढळून आला. पोलीसांनी त्याच्या ताब्यातील पिकअप वाहन जप्त केला. या प्रकरणी दिंद्रुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यानंतर केवळ एक तासातच, रात्री १० वाजता लोनगाव चौकाजवळ तपासणीदरम्यान आणखी एक वाहन जप्त करण्यात आले. जीवन काशिनाथ साळवे हा टेम्पोमधून दीड ब्रास वाळू विनापरवाना वाहतूक करताना सापडला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
प्रत्यक्ष कारवाईत सपोनि, महादेव ढाकणे, पोउपनि, पवनसिंग जंघाळे, भराडे, सचिन गायकवाड यांनी सहभाग नोंदवला. तर शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सिंदफणा नदीपात्रातून अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण ८ लाख ८ हजार किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून आर ोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी पोलीस हवालदार तुषार गायकवाड आणि पोलीस अंमलदार सुनील बहिरवाळ हे बीटमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की माळेवाडी शिवारातील सिंदफणा नदीपात्रात एक ट्रॅक्टर अनधिकृतपणे वाळू घेऊन जात आहे.
त्यानुसार पथकाने तत्काळ घटनास्थळी छापा टाकला असता, तेथे हिरव्या रंगाचा जॉन डीअर ट्रॅक्टर वाळूने भरलेला अवस्थेत मिळून आला. तपासात सदर ट्रॅक्टर चालक हनुमंत रामभाऊ काशीद हा वाळू विनापरवाना वाहतूक करत असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अवैध वाळू वाहतुकीवर आळा
शिरूर कासार पोलिसांनी वेळेवर केलेल्या या कारवाईमुळे परिसरात वाढत चाललेल्या अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे अशा बेकायदेशीर कामांवर नियंत्रण ठेवण्यास मोठी मदत झाली आहे.
गोदावरी काठावरही कारवाई
गेवराई पोलिसांच्या पथकाने गोदावरी काठावर अवैधरित्या वाळु घेवून जाणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. यामध्ये जुन्या नागझरी परिसरात एका ट्रकमध्ये अवैधरित्या उपसा केलेली वाळू भरली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्या ठिकाणी पोलिस दाखल होतास सुनील माळी नावाचा व्यक्ती ट्रॅक्टर व लोडर घेवून पसार झाला तर मनोज जोगदंड याच्या ताब्यातून एक ट्रक जप्त करण्यात आला. या प्रकरणात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.