Burglary in Kej taluka; valuables worth five lakhs stolen
केज, पुढारी वृत्तसेवा: सध्या शेतकरी शेतातील कामामध्ये गुंतलेला असतांना चोरटे घरफोड्या करत लाखोंचा ऐवज लूटत आहेत. केज तालुक्यातील नांदुरघाट जवळ असलेल्या खोमणवाडी येथे भरदुपारी शेतातील घर फोडून ५ लाख १२ हजार रुपये किमतीचे साडेसहा तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत.
बीड तालुक्यातील पालसिंगण येथील रहिवाशी अमोल भिमराव जगताप यांचे केज तालुक्यातील नांदुरघाट जवळ असलेल्या खोमणवाडी शिवारातील शेत असून शेतात त्यांचे घर आहे. दि.३ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता चे सुमारास नांदुरघाट येथून जवळच असलेल्या खोमणवाडी शिवारातील त्यांच्या शेतातील घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराची कडी उघडुन घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले ५ लाख १२ हजार रुपये किमतीचे ६ तोळे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले.
या प्रकरणी अमोल जगताप यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर हे तपास करीत आहेत. चोरीचा तपास करण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण करून चोरांचा माग काढण्याचा देखील प्रयत्न केला असून पोलिस या चोरीचा कसून तपास करीत आहेत.
निमगाव येथे चोरी
गेवराई पुढारी वृत्तसेवा : गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निमगाव मायंबा येथे शेतकऱ्याचे घर फ ोडून चोरट्यांनी १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. निमगाव येथील शेतकरी आबासाहेब घुंगरड हे आपल्या परिवारासह दि. २ जानेवारी रोजी शेतात काम करण्यासाठी गेले होते.
या संधीचा फायदा अज्ञात चोरट्यानी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले नगदी ६० हजार व सोन्याचे दागिने असा १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेले. या प्रकरणी आबासाहेब घुंगरड यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि संदिप पाटील करत आहेत.