Burglary accused arrested within twelve hours
बीड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील स्वराज्यनगर भागातील आकाश कातांगडे यांच्या घरी दि. ६ ऑक्टोबर रोज रात्री चोरी झाली होती. या प्रकरणातील आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या बारा तासांत अटक केली आहे. त्याच्याकडून सोन्याच्या दागिन्यासह दोन मोबाईल देखील जप्त करण्यात आले आहेत.
बीड शहरातील स्वराज्यनगर भागातील आकाश कातांगडे यांच्या घराच्या ग्रीलचे गज कापुन अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने व दोन मोबाईल लंपास केले होते. या प्रकरणात गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गजानन क्षीरसागर, रवि अघाव, ज्ञानेश्वर मराडे, अशोक राडकर, बाळु रहाडे, दिलीप राठोड, विलास कांदे यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनिय माहितीच्या आधारे प्रथमेश किसन जाधव (२०, रा. पंचशीलनगर, बीड) यास ताब्यात घेतले.
त्याने प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली, त्याच्याकडून मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.
आरोपीकडून बनवाबनवी
सीसीटीव्ही फुटेजवरुन शिवाजीनगर पोलिसांना दोघांवर संशय होता. त्यातील प्रथमेश जाधव याला चौकशीकरिता ताब्यात घेतले असता त्याने आपण हा गुन्हा केलाच नसून त्याच्या ओळखीच्या दुसऱ्या एकाने केल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच त्याच्याबाबत माहिती देखील देतो असे तो म्हणाला. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही शक्यतांवर तपास केला. पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी स्वतः या तपासात लक्ष दिल्यानंतर प्रथमेश हाच आरोपी असल्याचे समोर येताच त्याच्या घराची देखील घडती घेतली असता मुद्देमाल आढळून आला.
प्रथमेश सराईत चोरटा
प्रथमेश हा नशेच्या आहारी गेलेला असून त्याने यापूर्वी देखील घरफ ोडी, चोरी यासारखे गुन्हे केलेले आहेत. त्याला अटक केल्यानंतर त्याने यापूर्वीच्या गुन्ह्यासह आणखी एका गुन्ह्याची माहिती दिली असून त्याचा देखील तपास आता केला जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले.