हक्काच्या पाण्यासाठी 29 मे रोजी मोर्चा pudhari photo
बीड

Beed Farmer Protest : हक्काच्या पाण्यासाठी 29 मे रोजी मोर्चा

गावागावात जनजागृतीसाठी बैठका; महिलाही सरसावल्या, पाण्यासाठी लढण्याचा निर्धार

पुढारी वृत्तसेवा

बीड ः जायकवाडी धरणाचे हक्काचे पाणी मिळावे यासाठी लोकलढा आंदोलनातील शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर 29 मे रोजी बैलगाडी मोर्चा काढण्याचा एल्गार पुकारला आहे. या मोर्चात शेतकर्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे शेतकरी, तरुण गावोगाव बैठका घेत ग्रामीण भाग पिंजून काढत आहेत.

शासन नदीजोड प्रकल्पाच्या घोषणा करते, प्रत्यक्षात मात्र हा प्रकल्प कधी होईल, हे सांगता येत नाही. विदर्भात वैनगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पाला निधी दिला जातोय, मात्र गोदावरी-सिंदफणा नदीजोड प्रकल्प अद्याप लालफितीत अडकलेला आहे. गोदावरी-सिंदफणा नदीजोड प्रकल्प व श्री क्षेत्र भगवान गड ते तालखेडपर्यंत उपकलवा करावा यासाठी सर्वे करण्याचे पत्र जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संभाजीनगर येथील वरिष्ठ अधिकारी यांना दिले आहे.

यासाठी लोकलढा आंदोलनातील शेतकरी लोकशाही मार्गाने प्रयत्न करीत आहेत, मात्र शासन याची दखल घेत नाही. यासह कोकणचे जे 168 टीएमसी पाणी येणार आहे, त्यातही बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

या मागणीसाठी शेतकरी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात शेतकऱ्यांनी बैलगाडी घेऊन सहभागी व्हावे यासाठी लोकलढा आंदोलनातील समन्वयक, तरुण शेतकरी गावोगाव जाऊन बैठका घेत आहेत.

  • या बैठकांना शेतकरी, तरुणांसह महिलांचाही मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत आहे. श्री क्षेत्र भगवान गड. शिरूर, बीड, गेवराई, वडवणी व माजलगाव तालुक्यातील शेतीचा पाण्याविना उन्हाळा झाला आहे. या भागातील शेतीला हक्काचे जायकवाडी धरणाचे पाणी नसल्याने शेतकऱ्यांची पिके जळून जात आहेत. पाण्याअभावी शेतकऱ्यांना केवळ एकच पीक घेता येत आहे, त्यामुळे शेती सातत्याने तोट्यात जात आहे. याचा परिणाम शेतकरी आत्महत्या, शेतकरी कर्जबाजारीपणा यासह आरोग्य, शिक्षण आदींवर होत आहे. या विषयावर बैठकांमधून जनजागृती करुन शेतकर्यांसह चर्चा केली जात आहे. पाचेगाव, पाडळसिंगी, तळवट बोरगाव, हिरापूर, टाकळगाव, कानडा पिंपळगाव, एरंडगाव, इरगाव आदी गावांमध्ये बैठका झाल्या असून बैलगाडी मोर्चात हिररिने सहभाग घेण्याचा निर्धार शेतकरी, तरुणांमधून व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT