Bulldozer Action on Kulkarni's Construction Amidst NEET Controversy
बीड, पुढारी वृत्तसेवा : नीट पेपरफुटीतील आरोपी प्रा.पी. व्ही. कुलकर्णी याने बीडमध्ये टोलेजंग पाच मजली इमारतीचे बांधकाम सुरु केले होते. त्याचे हे बांधकाम नियमबाह्य असल्याचे नगरपालिकेच्या मोजणीमध्ये समोर आले होते. यानंतर नगरपालिकेने तोडक कारवाईचा इशारा दिला होता. सोमवारी कुलकर्णी याने स्वतःच बुलडोझर चालवत अतिक्रमणातील भाग पाडून टाकला.
देशभरात गाजत असलेल्या घोटाळ्यात प्रा.पी.व्ही. कुलकर्णीचे नाव समोर आले होते. हा कुलकर्णी मूळ बीडचा असल्याने त्याचे वडीलोपार्जीत घर बीडमध्ये आहे. या ठिकाणचे घर पाडून त्याने काही विकासकांच्या मदतीने टोलेजंग पाच मजली इमारत उभारणीचे काम हाती घेतले होते. या पाच मजली इमारतीत तब्बल तीस सदनिका असणार होत्या.
घोटाळ्यात कुलकर्णी याचे नाव समोर आल्यानंतर या इमारत बांधकामाची देखील चर्चा होत होती. ही इमारत नियमानुसार बांधली जात नसल्याचे तसेच यासाठी बांधकाम परवानगी देखील घेतली गेली नसल्याचे समोर आले होते. यानंतर नगरपालिकेने तोडक कारवाईचा इशारा देत नोटीस बजावली होती.
तसेच तोडक कारवाईसाठीचा खर्च देखील संबंधीताकडून वसूल केला जाईल अथवा प्रॉपर्टीवर बोजा चढवला जाईल असा इशारा मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी दिला होता. ही कारवाई होण्यापूर्वीच कुलकर्णी व त्याच्या सहकाऱ्यांनी स्वतःच बुलडोझर लावत रस्त्याच्या अगदी बाजुला करण्यात आलेले बांधकाम पाडले आहे. नगरपालिकेने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळेच ही कारवाई झाल्याची चर्चा होत आहे.
पुन्हा परवानगी घ्यावी लागणार : फडसे
सदर भुखंडावर करण्यात आलेले बांधकाम हे परवानगीशिवाय करण्यात आले होते. तसेच नियमाचा भंग देखील झाल्याचे दिसून येत होते. त्यानुसार आम्ही नोटीस बजावली होती. संबंधीत जागा मालकाने स्वतःहून अतिक्रमणातील बांधकाम पाडल्याची माहिती मिळाली आहे. ज्यावेळी त्यांच्याकडून बांधकाम परवानगी मागितली जाईल त्यावेळी असलेले बांधकाम प्रत्यक्ष पाहिले जाईल व नियमानुसार असेल तरच परवानगी दिली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी दिली.