गौतम बचुटे
केज :- बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. बुलढाणा बंद होणार असल्याच्या चर्चेने केज मध्ये सोने ठेवीदारांची प्रचंड गर्दी उसळली आहे. रात्री ८:०० वाजून गेल्या नंतरही बँकेत आणि बँकेच्या बाहेर ग्राहकांची गर्दी असून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज येथे केज मांजरसुंबा रोडवर असलेल्या कॉम्पेक्सच्या पहिल्या मजल्यावर बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. बुलढाणा शाखा केज चे कार्यालय आहे. ही क्रेडिट सोसायटीची केज मधील शाखा बंद होणार असल्याच्या अफवेने या शाखेत खाते असणाऱ्या सोने ठेवीदारांनी आपल्या रकमा बुडू नयेत म्हणून त्यांच्या ठेवी व डिपोजिट काढून घेऊन नुकसान टाळण्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे. मात्र या बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता बँकेच्या अधिकाऱ्यांनी काही माहिती दिली नाही.
रात्री ८:०० वाजून गेले तरी बँकेत आणि बँके समोर प्रचंड गर्दी :-
बँकेची वेळ संपलेली असताना सुद्धा रात्री ८:०० वाजल्या नंतर सुद्धा ठेवीदारांची बँकेत आणि बँके समोर प्रचंड गर्दी आहेम अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर, संदीप मांजरे आणि पोलिस कर्मचारी यांचा बंदोबस्त आहे
सकाळ पासून ही शाखा बंद होण्याची शहरात चर्चा आहे. त्यामुळे आम्ही नुकसान होऊ नये म्हणून ठेवी परत मिळविण्यासाठी रांगेत उभे आहोत.रामधन चाटे, ठेवीदार