गेवराई : राज्यभरात मल्टिस्टेट संस्थांविरोधात सुरू असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर अफवांचे पेव फुटल्याने बुलढाणा अर्बन मल्टिस्टेट बँकेच्या विविध शाखांबाहेर ठेविदारांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमुळे बीड जिल्ह्यातील गेवराई येथील शाखेसमोरही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
गेवराई शहरातील शासकीय रुग्णालयासमोर बुलढाणा अर्बन मल्टिस्टेट बँकेची शाखा असून, राज्यभरात संस्थेच्या ३०० हून अधिक शाखा कार्यरत आहेत. पारदर्शक व विश्वासार्ह व्यवहारासाठी ओळखल्या जाणाऱ्या या बँकेबाबत मागील तीन दिवसांपासून पसरविण्यात आलेल्या अफवांमुळे ठेविदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बीड जिल्ह्यात यापूर्वी ज्ञानराधा, साईराम, छत्रपती, राजस्थानी, जिजाऊ आदी संस्थांमध्ये ठेवलेले हजारो ठेविदारांचे कोट्यवधी रुपये अडकल्याचा कटू अनुभव नागरिकांनी घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अनेक ठेविदारांनी आपले सोनं व ठेवी परत घेण्यासाठी बँकेसमोर गर्दी केल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, बुलढाणा अर्बन मल्टिस्टेट बँकेकडून ठेविदारांच्या मागणीनुसार कोणतीही अडचण न आणता रक्कम व सोनं परत दिले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. बँकेचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू असून, गेवराई शाखेत सर्व कर्मचारी उपस्थित आहेत. तसेच, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शाखेबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यासंदर्भात बोलताना संस्थेचे प्रतिनिधी राधेश्याम चांडक यांनी, “बुलढाणा अर्बन मल्टिस्टेट बँकेच्या सर्व ठेविदारांच्या ठेवी व सोनं १०० टक्के सुरक्षित असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन केले आहे.