बीड : ओबीसींच्या महाएल्गार सभेत बोलताना मंत्री छगन भुजबळ व समोर उपस्थित ओबीसी बांधव. Pudhari file Photo
बीड

Chhagan Bhujbal | तुमच्या नेत्यांना आवरा, अन्यथा आगामी निवडणुकीत हिशेब करू

बीडच्या महाएल्गार सभेतून भुजबळांचा थेट भाजपलाच इशारा

पुढारी वृत्तसेवा

बीड : मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने 2 सप्टेंबर रोजी काढलेल्या जीआरच्या विरोधात बीड येथे शुक्रवारी आयोजित ओबीसींच्या महाएल्गार सभेतून सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी थेट भाजपलाच इशारा दिला. तुमच्या नेत्यांना आवरा, अन्यथा तुमचे राजकीय नुकसान कसे करायचे हे मला माहीत आहे. आगामी निवडणुकीत तुमचा हिशेब करू, अशा शब्दांत भुजबळ यांनी भाजपला खडे बोल सुनावले.

बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाएल्गार मेळावा शुक्रवारी पार पडला. यावेळी व्यासपीठावर आ. धनंजय मुंडे, आ. गोपीचंद पडळकर, आ. कायंदे, प्रकाश शेंडगे, प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्यासह ओबीसी नेत्यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, विखेंनी जीआरमधील पात्र हा शब्द एका तासात काढला. त्यावेळी सीएम नागपूरला होते. यांनी परस्पर निर्णय घेतला. हे लोक देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत. बीजेपीच्या नेत्यांना सांगतोय, आज तुम्हाला ओबीसीच्या ताकदीवर 125-135 आमदार मिळाले, त्या ओबीसीवर अन्याय कराल तर ओबीसी दूधखुळे नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर यामध्ये आपल्याला मार्ग काढावा लागेल. भाजपच्या नेत्यांना सांगतो की, तुमच्या लोकांना आवरा. तुमचे राजकीय नुकसान कसे करायचे हेसुद्धा मला माहीत आहे. खूप सहन केले. ‘चूप रहकर क्या मिलता हैं आखीर, दिल का दर्द ही पडता हैं, उठानी पडती हैं आवाज जब पानी सर के उपर चढता हैं...’ अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपतील नेत्यांसह ओबीसी आरक्षण धोक्यात आणणार्‍यांना इशारा दिला.

अंगावर आला तर शिंगावर घेऊ : धनंजय मुंडेंचा जरांगेंना इशारा

आमच्या अंगावर आला तर शिंगावर घेण्याची आमची तयारी आहे. आमच्या नादाला लागू नका, असा गर्भित इशारा देत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, न्याय हक्कासाठी हा महाएल्गार मेळावा आयोजित केला असून या आंदोलनकर्त्यांनी माणसात माणूस ठेवला नाही. गावागावांत जातीचे विष पेरले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यात एवढे जाती-जातीमध्ये विष पेरणे हे कितपत योग्य आहे. आपण सर्वजण आता या लढ्यासाठी छगन भुजबळ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे आहे. मराठा समाजाच्या तरुण-तरुणींना माझी विनंती आहे की, त्यांनी ईडब्ल्यूएसचा लाभ घ्यावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT