बीड

Bhagwangad Palkhi Sohala | श्री क्षेत्र भगवानगडाच्या पायी पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान!

आ.मोनिकाताई राजळे, प्रतापराव ढाकणे, बाळासाहेब सानप यांची पालखी प्रस्थानासाठी उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

शिरूर : महाराष्ट्रातील लाखो -भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र भगवानगडाच्या पालखीचे आषाढी एकादशीनिमित्त आज सोमवार दि.१३ जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. श्री क्षेत्र भगवानगडाचे संस्थापक श्री संत भगवानबाबा यांनी नारायणगडावर असतानाच मराठवाड्यातून पहिला पायी पालखी सोहळा प्रारंभ केला होता. हीच परंपरा भगवानगडाच्या स्थापनेपासून ते आजतागायत सुरु आहे.

श्री क्षेत्र भगवानगडावरुन निघणाऱ्या या पायी पालखी सोहळ्याचे सोमवारी दुपारी ठीक ३ वाजता प्रस्थान झाले. पालखीचे मुक्काम अनुक्रमे भारजवाडी, बावी, खोकरमोह, करंजवन, डिघोळ, जयवंतनगर, कुंबेफळ, आवार पिंपरी, कुर्डुवाडी, ढेकळेवाडी या ठिकाणी होऊन अकराव्या मुक्कामाला पालखी पंढरपूरमध्ये पोहोचते. दरम्यान प्रस्थानापासून ते पंढरपूरमध्ये पोहोचेपर्यंत अनेक दिंड्या भगवानगडाच्या पायी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात.

यामध्ये प्रामुख्याने अंभोरे येथील भोसले महाराजांची दिंडी, गुंजमुर्ती संस्थान, शेषाबाई संस्थान तांबवा, रामगड संस्थान, विठ्ठलगड संस्थान, रामेश्वर संस्थान, भगवानबाबा संस्थान सुपेसावरगांव, भोगलवाडी संस्थान, राजा हरिश्चंद्र संस्थान, जवळा ग्रामस्थ, बोरकिन्ही ग्रामस्थ, भाग्येश्वर संस्थान तरडगव्हण, गणपतबाबा संस्थान सावरगाव, कुमंडलेश्वर संस्थान घोगस पारगांव, सिद्धेश्वर संस्थान शिरुर कासार, मायंबा संस्थान भालगांव, भगवानबाबा संस्थान छत्रपती संभाजीनगर-पैठण-आळंदी, कानिफनाथ संस्थान खडकवाडी, केशवराज संस्थान वारणी,निरंजन संस्थान एकनाथवाडी, सुदर्शन गड संस्थान पाटणसांगवी, जय हनुमान संस्थान राणेगांव, दुर्गाशक्तीगड भिलवाडे, कानिफनाथ संस्थान खर्डा, हनुमान टाकळी संस्थान, शहर टाकळी संस्थान, कानिफनाथ संस्थान खोकरमोह, सालसिद्धेश्वर संस्थान मिडसांगवी, संत भगवानबाबा संस्थान तागडगांव इत्यादी संस्थानांचा समावेश होतो.

ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या भव्यदिव्य पायी पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा, गडाचे उत्तराधिकारी ह.भ.प.श्री.कृष्णा महाराज शास्त्री, प्रधानाचार्य ह.भ.प.वेदांताचार्य श्री. नारायण महाराज शास्त्री, आमदार मोनिकाताई राजळे, प्रतापराव ढाकणे, जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, ह.भ.प.महंत श्री.भगवान म. राजपूत शास्त्री, ह.भ.प.महंत श्री.नवनाथ महाराज शास्त्री, ह.भ.प.महंत श्री.अतुल महाराज शास्त्री, ह.भ.प.महंत श्री.हनुमंत महाराज शास्त्री, ह.भ.प.महंत श्री.संतोष महाराज शास्त्री, ह.भ.प.महंत श्री.केशव महाराज शास्त्री, ह.भ.प.महंत श्री.विवेक महाराज शास्त्री,ह.भ.प.महंत श्री.गणेश महाराज शास्त्री,ह.भ.प.महंत श्री.काशिनाथ महाराज शास्त्री यांसह भगवानगड परिसरातील हजारो भाविकांची उपस्थिती होती.

या भाविकांनी दिली पंगत

श्री क्षेत्र भगवानगडावरून पालखीत जाणाऱ्या व पालखी वाटेला लावण्यासाठी जमलेल्या लाखो भाविकांना सखाराम दादा खेडकर (मालेवाडी), भगवान भिवसेन खेडकर (मालेवाडी), गोरक्ष पांडुरंग सानप (मालेवाडी), बाबुराव वामनराव ढाकणे (ढाकणवाडी), गंगाधर आश्रुबा ढाकणे (ढाकणवाडी), भानुदास सखाराम जाधव (खरवंडी), हनुमंत रघुनाथ खेडकर, (दहिवंडी), जालिंदर सूर्यभान सानप (माळेगांव) या भाविकांनी डाळभट्टी, लापसी, जिरा राईस, वरण व आमटी भाकरीची पंगत दिली. गजानन माधवराव कांगणे यांच्यातर्फे गजानन माधवराव कांगणे (रानमळा, ता.मंठा जि. जालना) यांच्यातर्फे दिवसभर उपस्थित हजारो भाविकांना मोफत चहाचे वाटप करण्यात आले.

घोगस पारगावकरांच्या आकर्षक लेझीम पथकाने वेधले लक्ष

ऐश्वर्यसंपन्न श्री संत भगवानबाबांच्या पायी पालखी सोहळ्याच्या प्रस्थानप्रसंगी घोगस पारगांवच्या लेझीम पथकाने गडावर हजेरी लावली होती. पथकाच्या आकर्षक डावांनी उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून भाविकांना काही वेळ मंत्रमुग्ध केले होते.

साईगुलाब व दोस्ती बँडवर घुमला संत भगवानबाबांचा जयघोष

लाखो भाविकांच्या उपस्थितीत राजयोगी ऐश्वर्यसंपन्न श्री संत भगवानबाबांच्या पायी पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. यावेळी साईगुलाब व दोस्ती बँडवर श्री संत भगवानबाबांच्या जीवनचरित्रावर आधारित मन तृप्त करणारी भक्तीगीते भाविकांना ऐकावयास मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT