अशोक शिंदे pudhari photo
बीड

धक्कादायक : संतोष देशमुख यांच्या छळाचे फोटो पाहून व्यथित झालेल्या तरुणाने जीवन संपवले !

Youth ends life : घरातील आडूला घेतला गळफास

पुढारी वृत्तसेवा

केज : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहून मन सुन्न झाल्याने मानसिक दृष्ट्या धीर खचलेल्या केज तालुक्यातील २३ वर्षीय तरुणाने स्वतःच्या घरात आडूला गळफास घेवून जीवन संपवले आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे व त्यांचा मारेकऱ्यांनी अत्यंत निर्दयी आणि अमानवनिय पद्धतीने छळ करून त्यांचा खून करण्यात आला. खून केल्यानंतरही त्यांच्या मृतदेहाची विटंबना करून माणुसकीला काळीमा फासून क्रौर्याची परिसीमा ओलांडून त्यांच्या मृत्यूचा आनंद त्यांनी साजरा केला. त्या घटनेचे फोटो प्रसिद्धी माध्यमातून प्रसिध्द झाले आणि ते फोटो पाहून केज तालुक्यातील जानेगाव येथील तरुण अशोक शिंदे हा व्यथित झाला. त्याची मानसिक स्थिती त्यामुळे डळमळीत झाली.

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ दि. ४ मार्च रोजी जिल्हा बंदच्या आवाहनानंतर त्याने गावातील सर्व व्यवहार आणि दुकाने बंद करण्याचे आवाहन गावकऱ्यांना केले होते. गावातील सर्व व्यवहार बंद केल्यानंतर तो केज येथील बंद मध्ये सहभागी होण्यासाठी गेला होता. त्या नंतर दुपारी ४ वाजता त्याने गावातील घरात घरी कोणी नसताना आतून दरवाजा बंद करून घराच्या आडूला दोरीने गळफास घेवून आपली जीवन यात्रा संपविली.

त्यानंतर सायंकाळी अशोक शिंदे याची आई शेतातून घरी आली तिने दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला. परंतु आतून काही प्रतिसाद न आल्यामुळे तिने शेजाऱ्यांना बोलावून घेतले. त्या नंतर जमा झालेल्या गावकऱ्यांनी दरवाजा उचकटून घरात जावून पाहिले असता अशोक शिंदे याने गळफास घेतल्याचे आढळून आले.

दि. ५ मार्च रोजी अशोक शिंदे याचे शवविच्छेदन करण्यात आले असून दुपारी १:०० च्या सुमारास अंत्यविधी करण्यात आला. मागील दोन दिवसा पासून संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे फोटो पाहून अशोक शिंदे हा उद्विग्न झाला होता. सारखा तो त्याच्या मित्रा जवळ संतोष देशमुख यांच्या हत्येचा विषय काढून झालेली घटना अत्यंत निंदनीय आणि वाईट झाली असल्याचे बोलत होता, अशी माहिती गावातील नागरिकांनी दिली आहे.

दरम्यान, या बाबत युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्याशी संपर्क साधला असता या बाबत अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

धनंजय देशमुख यांनी केले आवाहन

अशोक शिंदे यांच्या आत्महत्येची माहिती मिळाल्या नंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सांगितले की, ते अशोक शिंदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. तसेच कुणीही अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT