केज : बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या पिशवीतले १ तोळ्याचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. ही घटना केज येथील बस स्थानकावर सोमवारी (दि.३१) दुपारी १.३० च्या सुमारास घडली. वारंवार घडत असलेल्या चोरीच्या प्रकरणांमुळे केज बसस्थानकांत पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी प्रवाशांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
धारूर तालुक्यातील आसोला येथील आशाबाई शामराव बोबडे या साळेगाव येथे बारशाच्या कार्यक्रमाला आल्या होत्या. सोमवारी दुपारी त्या साळेगावहून केजच्या बसस्थानकात आल्या. दुपारी १:३० च्या सुमारास धारूरला जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना त्यांच्या पिशवीची चैन उघडून सोन्याचे १ तोळ्याचे गंठण व बोरमाळ काढून घेत चोरट्याने पोबारा केला. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केल्याने चालक व वाहक हे प्रवाशांसह बस घेऊन ठाण्यात आले. त्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी महिला प्रवाशांना वाहतूक शाखेच्या रूममध्ये नेऊन झडती घेतली. तर पुरुष प्रवाशांची पोलिसांनी झडती घेतली. मात्र चोरी गेलेले दागिने मिळून आले नाहीत. दागिने चोरी झालेली महिला तक्रार देण्यासाठी ठाण्यात थांबली. त्यानंतर प्रवाशी घेऊन बस पुढे मार्गस्थ झाली.
दरम्यान केज येथील बसस्थानकात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. मात्र पोलीस खात्याकडून बसस्थानकात कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात नसल्याने चोरट्यांचे फावत आहे. केज बसस्थानकातील चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती करावी, अशी प्रवासी वर्गातून होत आहे.