बीड

बीड: पवनचक्की अधिकाऱ्याचे अपहरण; संशयिताला ३ दिवसांची पोलीस कोठडी

अविनाश सुतार

केज: पुढारी वृत्तसेवा: केज जवळील महामार्गावरील टोल नाक्याजवळ गाडी अडवून गावठी कट्टयाचा धाक दाखवून बारा ते तेरा जणांनी पवन चक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्याचे अपहरण केले. त्याच्याकडे 2 कोटींच्या खंडणीची मागणी केली. या प्रकरणातील आरोपीला केज पोलिसांनी गुन्हा दाखल होताच अवघ्या बारा तासांच्या आत ताब्यात घेत मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपी रमेश घुले याला न्यायालयात हजर केले असता दि. १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

या बाबत अधिक माहिती अशी की, अवादा या पवनचक्की प्रकल्पाच्या उभारणीचे काम करीत असलेले टागोर नगर नाशिक जिल्ह्यातील सुनिल केदु शिंदे (जालना रोड, बीड) आणि त्यांचे सहकारी हे २८ मेरोजी रात्री बीड कडून केजकडे येत होते. यावेळी रात्री सुमारे ११ च्या सुमारास मस्साजोग ते केज दरम्यान गंगा माऊली साखर कारखान्याला जवळील टोल नाक्याच्या पुढे एका पांढऱ्या रंगाची गाडीने (एम एच-१५/ ई बी-२६८२) त्यांची गाडी थांबविली. सुनील शिंदे यांनी गाडी थांबवली असता रमेश घुले याने सुनिल शिंदे यांना आपण अधिगृहण करीत असलेल्या पवन चक्कीच्या जागेसंदर्भात बोलायचे असल्याचे सांगून रमेश घुले यांना गावठी कट्ट्याचा धाक दाखवून खरवंडी (ता. पाथर्डी) येथे घेवून गेले. तेथे त्यांनी सुनिल शिंदे आणि त्यांच्या सहकारी यांना कंपनीचे काम करायचे असेल तर २ कोटी दयावी लागेल, अशी धमकी दिली.

दरम्यान सुनिल शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची सुटका करून घेत केज दि. २९ मे रोजी रात्री केज पोलीस ठाण्यात रमेश घुले आणि त्याचे अकरा ते बारा साथीदार यांच्या विरुद्ध अपहरण करून खंडणी मागणे व शस्त्र प्रतिबंधक कायद्या नुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

केज पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस नाईक महादेव बहिरवाळ, पोलीस नाईक संतोष गित्ते, पोलीस नाईक शहादेव मेहेत्रे यांनी सापळा रचून अवघ्या बारा तासांच्या आत मुख्य संशयित आरोपी रमेश घुले याला टाकळी फाटा येथून ताब्यात घेतले.केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक आनंद शिंदे हे तपास करीत आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT