विहीरीत पडलेल्या मारुती मुंडे यांना बाहेर काढल्यानंतर त्‍यांच्या चेहऱ्यावर जीवघेण्या संकटातून वाचल्याचा आनंद दिसत होता.  
बीड

Beed Rescue News | साठ फूट खोल विहिरीत पडले : मोबाईलही बंद पडला, हाका मारल्या.. शेवटी...... !

दैव बलवत्तर असल्यास कोणत्याही संकटातून जीव वाचू शकतो याचा प्रत्यय साळेगाव येथे, साठ फूट खोल विहिरीत पडून सुद्धा मारुती मुंडे सुखरूप

पुढारी वृत्तसेवा

गौतम बचुटे

केज : दि. २० नोव्हेंबर रोजी केज तालुक्यातील बोबडेवाडी येथील मारुती मुंडे हे शेतात शेळ्या चारण्यासाठी साळेगाव येथील शिवारात आले होते. त्यांनी राजाभाऊ वरपे यांच्या विहिरी शेजारी असलेल्या झाडांचा फांद्या आणि पाला त्यांनी शेळ्यांना तोडून टाकला. दरम्यान सायंकाळी ४:४५ वा. च्या सुमारास मारुती मुंडे विहिरीच्या काठा जवळून शेळ्या हाकण्यासाठी जात असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते ६० फूट खोल विहिरीत पडले. त्यावेळी विहिरीत अवघे कमरे एवढे पाणी होते. विहिरीत पडल्याने ते घाबरून गेले आणि विहिरीला वर चढण्यासाठी पायऱ्या किंवा अन्य मार्ग नव्हता. विहिरीत पडल्या नंतर त्यांनी मदतीसाठी आरडा ओरड केली आणि हाका मारल्या, परंतु जवळ कोणी नसल्याने आणि त्यांचा आवाज विहिरी बाहेर येत नसल्याने ते घाबरून गेले होते.

मोबाईल द्वारे त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण मोबाईलचं बंद पडला

मारुती मुंडे यांनी विहिरीत पडल्या नंतर मोबाइलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु मोबाईल मध्ये पाणी गेल्याने मोबाईलचं बंद पडला होता. तसेच ते थंडी आणि लागलेल्या मुक्या मारामुळे थकून गलितगात्र झाले होते. त्यातच सूर्यप्रकाश कमी होऊन अंधार पडू लागला होता.

अशोक ठरला देवदूत

दरम्यान सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास अशोक तोंडे हे विहीरी जवळून जात असताना त्यांना हाका मारण्याचा आवाज आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना विहिरीत मारुती असल्याचे दिसले, त्यांनी मग मदतीसाठी नागरिकांना कल्पना दिली.

तरुणांनी दाखविली हिम्मत

मारुती मुंडे याला विहिरी बाहेर काढण्यासाठी जय जोगदंड, अशोक तोंडे, अक्षय वरपे, राजाभाऊ वरपे, गौतम बचुटे, सौरभ वरपे, शोएब सय्यद, आशोक तोंडे, बाळु तोंडे, बालाजी तोंडे, शिवाजी तोंडे, संतोष तोंडे, ओमकार तोंडे, धनंराज तोंडे, महादेव वरपे रामा वरपे, लिंबराज बचुटे यांनी विहिरीत बाज सोडली आणि चारी कोपऱ्याला दोर बांधून हळूहळू त्यांना बाजेवर बसवून विहिरी बाहेर घेतले.

बाहेर येताच मारुती मुंडे वेदना विसरले :- मारुती मुंडे यांच्या डोक्याला किरकोळ मार लागला आहे. तसेच त्यांचा हात पायांना आणि कमरेला मुका मार लागलेला असताना सुद्धा जेव्हा त्यांना विहिरी बाहेर काढले तेव्हा सुखरूप बाहेर आल्या नंतर ते अक्षरशः पळायला लागले.

विहिरीत बाज सोडताना डोक्यात दगड लागू नये म्हणून हेल्मेट दिले :- मारुती मुंडे यांना बाहेर येण्यासाठी बाज विहीरीत सोडत असताना डोक्यात दगड पडू नये म्हणून राजाभाऊ वरपे यांनी एका दोराला बांधून हेल्मेट आत सोडले. ते हेल्मेट घालून मारुती विहीरीच्या भिंतीच्या कडेला बसले होते.

प्रशासकीय अधिकारी आणि नगराध्यक्ष यांनीही घेतली दाखल :- मारुती विहिरीत पडल्याची माहिती पत्रकार गौतम बचुटे यांनी केजच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड, उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे, तहसीलदास अशोक भंडारे आणि पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना देताच त्यांनी रेस्क्यू टीम आणि अग्निशामक दलाशी संपर्क साधला परंतू त्यांच्याकडे एवढ्या उंचीची शिडी उपलब्ध नाही आणि आपत्कालीन सुटकेची टीम ही छत्रपती संभाजी नगर येथे असल्याने त्यांना पोहोचण्यास सुमारे चार तास वेळ लागणार होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT