बीड

Beed news | जागतिक युद्धाची झळ अन् अवकाळीचा तडाखा, टरबूज उत्पादक शेतकरी संकटात

पुढारी वृत्तसेवा

गोविंद खरटमोल

अंबाजोगाई : एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे जागतिक घडामोडींचा परिणाम, अशा दुहेरी कात्रीत बीड जिल्ह्यासह अनेक ठिकाणचा शेतकरी अडकला आहे. अशातच अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील एका प्रयोगशील युवा शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत टरबूज लागवडीचा यशस्वी प्रयोग केला खरा, मात्र सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि अवकाळी पावसामुळे या शेतकऱ्याच्या स्वप्नांचा चक्काचूर झाल्याचे दिसून येत आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील प्रवीण पितळे या तरुण शेतकऱ्याने गेल्या दोन वर्षांपासून आपल्या पाच एकर शेतीमध्ये टरबूज लागवडीचा प्रयोग केला होता. सुरुवातीच्या काळात त्यांनी दीड एकरातून चांगला नफा मिळवला होता. सन २०२३ साली दीड एकरात २० टन टरबूजाचे उत्पन्न घेऊन १.८० लाखत १ लाखाचा नफा मिळवला होता. सन २०२४ साली एक एकरात १६ टन उत्पादन घेऊन १ लाखाचा नफा मिळवला. दोन वर्षाचे उत्पन्न व त्यातील यश व नफा पाहून प्रवीण यांनी २०२५ मध्ये जोखीम पत्करून तीन एकरात टरबूज लावले. यासाठी सुमारे ८० हजार रुपये खर्च देखील केला यातून त्यांना ३० टन उत्पादनाची अपेक्षा होती. यातून किमान साडेतीन लाख रुपये मिळतील अशी त्यांची खात्री होती. मात्र नियतीला काही औरच मान्य असल्याचे चित्र निर्माण झाले.

जागतिक पातळीवर युद्ध सुरू झाले . त्याची झळ संपूर्ण जगातील अनेक देशांना सोसावी लागत आहे. सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीवर परिणाम झाला असून बाजारात टरबूजाचे भाव कोसळले आहेत. त्यातच भर म्हणून जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे हाताशी आलेला माल खराब होत आहे. कष्टाने पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने प्रवीण पितळे यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

प्रवीण पितळे यांनी अत्यंत उद्वेगाने आपली कैफियत मांडली आहे. ते म्हणतात की,"शासनाकडून वेलवर्गीय पिकांसाठी ना कोणते अनुदान आहे, ना पीक विम्याचे कवच. अशा परिस्थितीत जेव्हा नैसर्गिक किंवा जागतिक संकट येते, तेव्हा शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त होतो. याच हतबलतेतून शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो." यामुळे शासनाने वेलवर्गीय पिकांचा समावेश तातडीने पीक विमा योजनेत करावा. नुकसानग्रस्त टरबूज उत्पादकांना शासनाने विशेष अनुदान द्यावे. अस्मानी संकटात सापडलेल्या बागायतदार शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा आर्थिक मदत द्यावी.आता या तरुण शेतकऱ्याची हाक सरकारपर्यंत पोहोचणार का? आणि अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या पूर्वअंदाजानुसार, संपूर्ण राज्यासह बीड जिल्ह्यातही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गा अस्मानी संकटामुळे बळीराजाच्या तोंडाचा घास हिरावला गेला असून बीड जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, १ एप्रिल रोजी झालेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल २३७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानी सोबतच जनावरे दगावली आहे. बीड जिल्ह्यात मागच्या वर्षी मे महिन्यात अवकाळी पावसामुळे संपूर्ण धरणे तुडूंब भरली होती. यंदा मार्च महिन्यापासूनच अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. रब्बीची पिके काढणी जवळपास पूर्ण झाली आहे. परंतु काढलेल्या पिकांना पावसाचा फटका बसत आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील चार तालुक्यांना या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, एकूण १२ गावांमधील ५५४८ शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा एकूण २३७ हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांना या अवकाळीचा फटका बसला आहे. हाती आलेले पौक अचानक आलेल्या पावसामुळे खराब झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT