बीड

Beed news | काम कागदावरच; पाणी मुरले कुठे..?

कारी गावात जलजीवनमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप; महिलांचा घेराव

पुढारी वृत्तसेवा

धारूर : तालुक्यातील कारी गावात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, अपूर्ण काम असूनही निधी काढण्यात आल्याचा गंभीर मुद्दा पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी थेट जाब विचारत घेराव देखील घालण्यात आला.

धारूर तालुक्यातील कारी गावात जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात काम पूर्ण न होता देखील कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवून निधी काढण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे गावात पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली असून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी, अभियंते व चौकशी समिती गावात दाखल झाली. यावेळी गावातील महिलांनी आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांना घेराव घातला. योजना आहे पण पाणी नाही, मग कामाचे पैसे कुठे गेले? असा थेट सवाल महिलांनी उपस्थित केला. महिलांच्या संतापामुळे काही काळ गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यावेळी गावातील युवक मिलिंद मुजुमले यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत सांगितले की, तत्काळ पाण्याची सोय करून द्या, अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने मोठा मोर्चा काढू.

ग्रामस्थांनीही काम झाल्याचे कागदावर दाखवले, पण प्रत्यक्षात काहीच दिसत नाही, अशी तीव्र नाराजी व्यक्त केली. या सर्व घडामोडींमध्ये अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नागरिकांचा संताप आणखी वाढला. सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मुजुमले सह ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, लवकरात लवकर पाणीपुरवठ्याची योग्य व्यवस्था न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. सदर प्रकरणात प्रशासन कोणती ठोस कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT