केज : खंडणी प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी विष्णू चाटे याला सीआयडीने संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेऊन केज न्यायालयात हजर केले. या हत्येच्या गुन्ह्यात विष्णू चाटे याला न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा एनर्जी या पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्या प्रकरणी विष्णू चाटे याच्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याला १८ डिसेंबर रोजी बीड मधून ताब्यात घेतले होते. काल १० जानेवारी रोजी त्याला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सूनावली होती.
दरम्यान विष्णू चाटे याच्यावर खंडणी आणि हत्या या दोन वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे सीआयडीच्या पथकाने आज दि. ११ जानेवारी रोजी त्याला न्यायालयाच्या परवानगीने कारागृहातून ताब्यात घेतले. अतिरिक्त सत्र त्या न्यायाधीश कुणाल जाधव यांच्या न्यायालयात सादर हजर केले असता न्यायालयाने त्याला दिनांक १३ जानेवारी पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या वेळी सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तिवाद केला. तर आरोपीच्या वतीने ॲड. राहुल मुंडे यांनी बाजू मांडली. दोन्ही पक्षांच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेत न्यायाधीश कुणाल जाधव यांनी त्याला दोन दिवसाची सीआयडी कोठडी सुनावली आहे.
२४ दिवस आरोपी ताब्यात असताना काय केले. असे मत मा. न्यायालयाने नोंदविले. तसेच आरोपीला दोन दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. २४ दिवस आरोपी तपास पथकांच्या ताब्यात असताना चौकशी पुढे सरकत नसल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.