केज : विलास घुले यांच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांना अटक करावी, प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, तसेच घुले कुटुंबीयांना शासकीय मदत द्यावी, या मागण्यांसाठी शनिवारी (१२) केज-मांजरसुंबा मार्गावरील टाकळी फाटा येथे सुमारे पाच तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. नायब तहसीलदार अशोक भंडारे यांनी आंदोलकांच्या मागण्यांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला होता. या प्रकरणात सौरभ सोनवणे हे कटाचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप घुले कुटुंबीयांनी केला आहे. पुरवणी जबाबातही त्यांच्या नावाचा उल्लेख असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे सौरभ सोनवणे यांना मुख्य सूत्रधार म्हणून अटक करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, सरकारी वकील म्हणून ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि ॲड. बाबुराव तिडके यांची नियुक्ती करावी, विलास घुले यांच्या विधवा पत्नीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, तसेच वृद्ध आई-वडिलांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या. याशिवाय आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी आणि विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले यांच्या जीविताला धोका असल्याने त्यांना पोलिस संरक्षण द्यावे, अशीही मागणी करण्यात आली.
विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले, कुटुंबीय आणि नातेवाईक यांच्या वतीने सकाळी ११.३० वाजता रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली. दुपारी ४.३० वाजता आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनामुळे केज-मांजरसुंबा मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
नायब तहसीलदार अशोक भंडारे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारले. आंदोलकांची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घडवून आणण्याचे तसेच त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम, पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ, युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर, सहाय्यक पोलिस निरीक्षक शेख यांच्यासह धारूर व नेकनूर येथील पोलिस अधिकारी, आरसीपीची एक तुकडी आणि गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तावर होते.
बंदोबस्तातील मनुष्यबळ : ११ पोलिस अधिकारी, ५९ पोलिस कर्मचारी, आरसीपीची एक तुकडी आणि गृहरक्षक दलाचे २९ जवान.