केज : विलास घुले खून प्रकरणाशी संबंधित असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी उमेश माने याला केज पोलिसांनी अखेर अटक केली. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या दीड महिन्यापासून फरार असलेल्या माने याला मंगळवारी (१ सप्टेंबर) कदमवाडी येथील त्याच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.
बीड जिल्ह्यातील कदमवाडी येथील उमेश माने याने एका विवाहित महिलेवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच अत्याचाराचे व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने केली होती. याबाबत कोणाला सांगितल्यास तिला, तिच्या पतीला आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणावरून पीडित महिलेचे नातेवाईक आणि उमेश माने यांच्यात २० जून रोजी केज-मांजरसुंबा रोडवरील विलास घुले यांच्या बळीराजा हॉटेलमध्ये वाद झाला होता. यावेळी मारामारी सुरू असताना उमेश माने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत होता. त्याला वाचवण्यासाठी हॉटेल मालक विलास घुले त्याच्या मागे धावत गेले. त्याचवेळी जमावातील एका व्यक्तीने विलास घुले यांच्यावर धारदार चाकूने वार केल्याचे पोलिस तपासात समोर आले.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विलास घुले यांचा २१ जून रोजी उपचारादरम्यान स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथे मृत्यू झाला. याप्रकरणी विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले यांच्या तक्रारीवरून बाबासाहेब गोरोबा कदम, मंगेश गुरुबा कदम, अजय रामराजे कदम, दीपक परसराम कदम, नवनाथ परसराम कदम, संतोष नरहरी कदम, रामेश्वर गायकवाड, शुभम रामभाऊ गायकवाड, भैय्यासाहेब गायकवाड आणि जीपचालक अशा दहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांचेही पुरवणी जबाबात नाव आल्याने त्यांच्या अटकेची मागणी जिल्ह्यातून करण्यात आली होती.
उमेश मानेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल होत नसल्याने पीडित महिलेने सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसारित करून तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती दिली होती. त्यानंतर १४ जुलै रोजी महिलेच्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४४४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(एम), ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास प्रभारी पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक राकेश नेटके करीत होते.
विलास घुले यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या घटनेनंतर उमेश माने सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर आपली बाजू मांडत होता. मात्र, त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. गेल्या दीड महिन्यापासून पोलिस त्याचा शोध घेत होते.
उमेश माने कदमवाडी येथे आल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण उंबरे यांना कारवाईच्या सूचना दिल्या. पोलिस पथकाने कदमवाडी येथील त्याच्या घरावर छापा टाकून उमेश माने याला ताब्यात घेतले. या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, पोलिस जमादार बाळासाहेब अहंकारे, शिवाजी कागदे, नितीन वारे, राहुल तरकसे, पूजा माके आणि अनिता दगडखैर सहभागी झाले.
विलास घुले खून प्रकरणाचा तपास सुरुवातीला आयपीएस अधिकारी तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडून करण्यात येत होता. आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे.