Beed Valmik Karad Digital Banner
बीड, पुढारी वृत्तसेवा : वाल्मीक अण्णा कराड संघटना मित्रमंडळाला मदत करण्याचे आवाहन करणारे एक बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामध्ये थोडीशी मदत अण्णासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी असाही मजकूर लिहलेला आहे. वाल्मीक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असून, तो सध्या कारागृहात आहे. त्याचे नाव सोशल मीडियात कायम ठेवण्यासाठी ही मदत करण्याचे आवाहन करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड हा सध्या बीड जिल्हा कारागृहात आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या सावरगाव येथील दसरा मेळाव्यात वी सपोट वाल्मीक अण्णा असे बॅनर काही लोकांनी झळकावले होते. यानंतर सोमवारी नवा प्रकार समोर आला. संदीप तांदळे नामक व्यक्तीच्या मोबाईल क्रमांक व क्यूआर कोडसह वाल्मीक अण्णा कराड संघटना मित्रमंडळ मजबूत करण्यासाठी तसेच सोशल मीडियावर वाल्मीक अण्णाचे नाव व चेहरा सातत्याने टिकून राहण्यासाठी आपले आर्थिक सहाय्य महत्त्वाचे आहे.
फुल ना फुलाची पाकळी दान करून मदत करा, तेव्हाच अण्णा आपल्यामध्ये एक दिवस येतील, थोडीशी मदत अण्णासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी, असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. बॅनरवर संत-महंतांच्या छायाचित्रांसह स्व. गोपीनाथ मुंडे व आ. धनंजय मुंडे यांचेही फोटो टाकण्यात आले आहेत. याखाली संदीप तांदळे असे नाव, त्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक व क्यूआर कोड देण्यात आलेला आहे. हे बॅनर व्हायरल होताच खून प्रकरणातील आरोपीचे नाव सोशल मीडियात ठेवण्यासाठी अशा पद्धतीने मदत गोळा होत असल्याच्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या बॅनरवर ज्या संदीप तांदळे याचे नाव आहे, त्याचीही प्रतिक्रिया समोर आली असून, त्याने हे बॅनर एडिट केलेले, नाहक बदनामीसाठी हा प्रकार असून, वाल्मीक कराड यांचा संबंध नाही, असे म्हटले आहे. तसेच राजकीय हेतूने, सामाजिक अशांतता पसरवण्यासाठी हे केले जात आहे, पोलिसांना नम्र विनंती करतो, बनावट बॅनर तयार करून प्रदर्शित केले, त्याचा शोध घेऊन कारवाई करावी. तसेच यासंदर्भात एसपींना अर्ज देणार आहे. माझा कसलाही संबंध नाही, हे सगळे बनावट आहे, असेही संदीप तांदळे याने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
ज्या संदीप तांदळेचे नाव बॅनरवर आहे, त्याच संदीप तांदळेने आ. जितेंद्र आव्हाड, आ. सुरेश धस यांच्यासह बाळा बांगर यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. तसेच यासंदर्भात बाळा बांगर यांनीही तक्रार दिलेली आहे. आता त्याच्याच नावाने वाल्मीक कराडसाठी मदत मागितली जात असून, त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करावी अन्यथा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा विजयसिंह ऊर्फ बाळा बांगर यांनी दिला आहे.