गौतम बचुटे
केज : वडिलांना उपचारासाठी लातूर येथे रुग्णालयात दाखल केल्याने घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी केज तालुक्यातील तांबवा येथील ट्रेझरीतील कनिष्ठ लेखापालाच्या घरात घरफोडी करून सुमारे पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला.
तांबवा येथील महादेव नारायण परळकर हे अंबाजोगाई येथील ट्रेझरी कार्यालयात कनिष्ठ लेखापाल म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे वडील नारायण परळकर यांना पक्षाघात (पॅरालिसीस) झाल्याने त्यांना २७ जून रोजी उपचारासाठी लातूर येथील विवेकानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांनी तांबवा येथील राहत्या घराला कुलूप लावून लातूर गाठले होते.
दरम्यान, १ जुलै रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता शेजारी राहणाऱ्या त्रिशाला भिमराव ओव्हाळ यांनी महादेव परळकर यांना दूरध्वनीवरून त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच परळकर तातडीने गावी आले. घराचे मुख्य दार उघडे असून दरवाजाला लावलेले कुलूप खिडकीजवळ बाजूला ठेवलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर कपाट व पेटीतील सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले.
चोरट्यांनी कपाटात ठेवलेल्या प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे 'सेव्हन पीस', १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण तसेच ५० हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ७५ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी हनुमंत परळकर यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम पुढील तपास करीत आहेत.
ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाची मदत
घरफोडीचा तपास करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण केले. पुरावे संकलित करून आरोपींचा माग काढण्यासाठी या पथकांची मदत घेण्यात आली.