Kej Manjarsumba Road Truck Cargo Robbery
केज : चालत्या ट्रकवर चढून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ७१ हजार ५०० रुपये किमतीच्या चहापत्तीच्या ११ बॅगा लंपास केल्याची घटना केज-मांजरसुंबा रस्त्यावर घडली. याप्रकरणी ट्रकचालकाच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील देवगाव कुसळी येथील ट्रकचालक मुसा बाबा शेख हे ट्रक क्रमांक एमएच-१५-डीके-२७३४ मधून चहापत्तीच्या बॅगा घेऊन लातूरकडे जात होते. ३० ऑक्टोबर रोजी पहाटे ५.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांचा ट्रक केज-मांजरसुंबा रस्त्यावरून जात असताना अंबळाचे बरड फाट्यापुढील सारुळ फाटा ते सांगवी फाटा दरम्यान ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी चालत्या ट्रकवर चढून प्रत्येकी २० किलो वजनाच्या चहापत्तीच्या ११ बॅगा चोरून नेल्या. या बॅगांची एकूण किंमत ७१ हजार ५०० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी ट्रकचालक मुसा शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर पुढील तपास करीत आहेत.