Beed Farmers Solar Pumps pudhari photo
बीड

Beed Farmers Solar Pumps : शेतीला पाणी देण्यासाठी रात्री जागून काढायचे दिवस गेले!

सौर कृषी पंपामुळे शेतकरी टेन्शन फ्री; जिल्ह्यात ७८ हजार शेतकर्‍यांना लाभ

पुढारी वृत्तसेवा

उदय नागरगोजे

बीड : दिवसभर असलेली लोडशेडिंग... कमी व्होल्टेज...यामुळे विद्युत पंप सुरूच करता येत नव्हता, पिकांना पाणी दिल्याशिवाय पर्याय नाही... अशा स्थितीत शेतकर्‍यांना रात्रीचे जागरण करून पिकांना पाणी द्यावे लागत होते, परंतु मागेल त्याला सोलार कृषी पंप योजनेमुळे शेतकरी टेन्शन फ्री झाले आहेत. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील 78 हजार शेतकर्‍यांना मिळाल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत यांनी दिली.

ग्रामीण भागात विद्युत पुरवठ्याच्या समस्या अनेकदा येत असायच्या. विद्युत रोहित्र जळाल्याने अनेक भागातील वीज महिनोमहिने बंद असायची, या तक्रारी कमी करण्यासाठी महावितरणकडून प्रयत्न केले जात आहेत. याबरोबरच शेतकर्‍यांना ज्या पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंप चालणे गरजेचे असते, तो विद्युत पंपच आता सौर ऊर्जेवर चालत असल्याने मोठी समस्या दूर झाली आहे.

ग्रामीण भागात होणारे लोडशेडींग, कमी व्होल्टेज याच्या समस्या नेहमी असायच्या. त्यामुळे शेतकर्‍यांना रात्र-रात्र जागून पिकांना पाणी द्यावे लागायचे. आता मात्र हा त्रास दूर झाला आहे. गत काही वर्षांपासून मागेल त्याला सोलार कृषीपंप योजना कार्यान्वित झालेली असून या योजनेतून जिल्ह्यातील 78 हजार 780 शेतकर्‍यांना आतापर्यंत कृषीपंप देण्यात आले आहेत.

यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी रात्री जागण्याची वेळ शेतकर्‍यांवर येत नाही. दिवसभरात जेव्हा शक्य असेल तेव्हा पिकांना पाणी देता येत आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही सुलभ असून ठराविक रक्कम भरल्यानंतर कृषी पंप उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती अधीक्षक अभियंता राजपूत यांनी दिली.

लाभार्थी निवडीचे निकष

अडीच एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकर्‍यास 3 अश्‍वशक्ती क्षमतेपर्यंत सौैर कृषीपंप, अडीच ते पाच एकरपर्यंत 5 अश्‍वशक्ती आणि 5 एकरांवरील शेतजमीन धारक शेतकर्‍यास 7.5 अश्‍वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप उपलब्ध करून दिला जातो. पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेचा सौर कृषीपंपा हवा असल्यास तो देखील उपलब्ध करून दिला जातो, वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरीसुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील.

ज्या शेतकर्‍यांकडे बोअरवेल, विहीर व नदी या ठिकाणी शाश्‍वत पाण्याचा स्त्रोत आहे. याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येते. तथापी जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत. यापूर्वी राबवण्यात आलेल्या योजनांचा लाभ न घेतलेले शेतकरी या योजनेत पात्र आहेत.

योजनेचे वैशिष्ट्ये

सर्वसाधारण गटाच्या शेतकर्‍यांसाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनलस व कृषी पंपाचा पूर्ण संच उपलब्ध करून दिला जातो. अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकर्‍यांसाठी लाभार्थी हिस्सा पाच टक्के, उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान दिली जाते. जमिनीच्या क्षेत्रानुसर 3 ते 7.5 एचपीचे पंप उपलब्ध करून दिला जातात. पाच वर्षाची दुरुस्ती हमी मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT