केज : तालुक्यातील चिंचोली माळी येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने तरुणाच्या सततच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मंगळवारी (दि.७) रात्री ही हृदयद्रावक घटना घडली. अनुजा सूर्यकांत मावकर असे मृत मुलीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी अक्षय भगवान काळे याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात विनयभंग आणि अनुजाला जीवन संपविण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनुजाने नुकतीच १० वीची परीक्षा देऊन सुट्टीला घरी आली होती. मंगळवारी (दि.७) रात्री आई- वडिलांसोबत जेवण केले. त्यानंतर रात्री १० च्या सुमारास आई-वडील दोघेही जनावरांना चारा-पाणी देण्यासाठी गेले असताना अनुजा घरात गेली आणि तिने आतून कडी लावून दरवाजा बंद करून घेतला. मुलगी आवाज देऊनही दार उघडत नसल्याने आईने दाराशेजारी असलेल्या खिडकीची काच फोडून आत हात घालून दरवाजा उघडला. तेव्हा अनुजाने घराच्या स्लॅबच्या लोखंडी हुकला ओढणीने गळफास लावल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आरडाओरड ऐकून शेजारी जमा झाले. याप्रकरणी अनुजाचे वडील सूर्यकांत मावकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अक्षय भगवान काळे याच्याविरुद्ध केज पोलिस ठाण्यात १८६/२०२६, भा. न्या. सं. ७८(१), १०७ आणि पोक्सोचे कलम १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे हे तपास करीत आहेत.
तरुणाच्या त्रासामुळे अनुजा होती मानसिक तणावाखाली
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अक्षय अनुजाच्या घराजवळ येऊन थांबला होता. त्याला पाहताच अनुजा प्रचंड घाबरली आणि घरात पळून गेली. तिने ही बाब पालकांनाही सांगितली होती, ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती..
नववीत असल्यापासून आरोपी देत होता त्रास
आरोपी अक्षय काळे हा अनुजा इयत्ता ९ वीत असल्यापासून तिचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. आरोपीने तिला वारंवार बळजबरीने मोबाईल देऊन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. याविषयी अनुजाने तिच्या आई-वडिलांना सांगितले होते. याबाबत त्याला त्याच्या नातेवाईकांनी देखील समज दिली होती. त्यानंतर काही दिवस तो शांत राहिला. पुन्हा अनुजाला त्रास देणे सुरू केले. त्यामुळे अनुजाला केज येथे सरस्वती विद्यालय केज येथे शिक्षणासाठी ठेवले व ती हॉटेलला राहत होती. तरी देखील अक्षय हा अनुजा तिच्या हॉस्टेलला जाऊन त्रास देत होता. या त्याच्या त्रासाला कंटाळून तिला पुन्हा तिला गावी आणले