बीड : शेततळ्याच्या दुरुस्तीचे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून 13 लाख 50 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वडाचीवाडी (ता. शिरुर कासार) येथील भरत नवनाथ खेडकर (वय 36) याने पुण्यातील धनंजय दिनकर धसे आणि त्याचा मुलगा देवाशिष धसे (दोन्ही रा. श्री स्वामी समर्थ सोसायटी, बाणेर रोड, पाषाण) यांच्याविरुद्ध चकलांबा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
भरत खेडकर हे खासगी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, धनंजय धसे याची खेडकर यांच्याशी 2006 मध्ये गावात शेततळे तयार करताना ओळख झाली. 2016 मध्ये धसेने खेडकर यांना शेततळ्याच्या दुरुस्ती आणि गाळ उपसण्याचे तब्बल 50 लाखांचे काम करून देण्याचे आश्वासन दिले. यासाठी भागीदारी करण्याचा प्रस्ताव मांडत धसे म्हणाला, पंधरा लाख रुपये तू दे, पंधरा लाख मी देतो. तीन-चार महिन्यांत काम पूर्ण होईल आणि तुला दहा लाखांचा नफा मिळेल. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून खेडकर यांनी जून 2016 पासून वेळोवेळी रोख आणि बँकेतून पैसे दिले.
सुरुवातीला वडाचीवाडी येथे धसेला पाच लाख रुपये रोख देण्यात आले. नंतर पंधरवड्यात पुण्यात धसेच्या घरी जाऊन आणखी दोन लाख रुपये दिले. त्यानंतर देवाशिष धसेच्या बँक खात्यात तसेच इंडो सिक्युरिटीज खात्यात तब्बल 4.50 लाख रुपये ऑनलाईन पाठवले. याचदरम्यान वकील जाधव नावाच्या व्यक्तीमार्फत रात्री 11 वाजता एक लाख रुपये रोख दिले. अशा प्रकारे एकूण 13 लाख 50 हजार रुपयांची रक्कम देण्यात आली.पैसे दिल्यानंतर सुरुवातीला धसेने काम सुरू होईल, पैसे परत मिळतील, अशी आश्वासने दिली. मात्र नंतर त्याने फोन उचलणे बंद केले. इतर नंबरवरून संपर्क साधल्यावर पैसे परत करतो असे सांगितले, पण प्रत्यक्षात पैसे परत केले नाहीत. एवढेच नव्हे तर तगादा लावल्यास पिस्तूल आहे, जिवे मारू शकतो, अशी धमकीही दिली.या धक्कादायक फसवणुकीनंतर खेडकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.
गुन्हा दाखल झालेले धनंजय धसे हे खासदार बजरंग सोनवणे यांचे पीए असल्याची चर्चा सोशल मीडियातून होत आहे. गेल्या काही दिवसांपासून धनंजय धसे हे खासदार सोनवणे यांचे दिल्लीमधील काम पाहतात अशी देखील चर्चा केली जात आहे.
धनंजय धसे हे माझे परिचित आहेत ओळखीचे आहेत परंतु ते माझे पीए नाहीत. 2016 मध्ये ते राज्याच्या विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याचे ओएसडी होते तसेच त्यांचे यापूर्वी कोणाकोणासोबत फोटो आहेत ते देखील पाहावे ते माझे पीए नाहीत आणि माझ्या एखाद्या पीएने असे काही कृत्य केले असते तर तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यावर कारवाई देखील व्हायला हवी जर संबंधित युवकाची फसवणूक झाली असेल तर त्या प्रकरणात पोलिस कारवाई करतील, परंतु विनाकारण माझी बदनामी करण्याचे हे सगळे प्रकार असून माझ्यावर आरोप करणार्यांनी आधी धनंजय रसे हे कोणासोबत होते हे देखील तपासावे असे खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे.