केज: संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाची संबंधित असलेले खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्या जामीन अर्जावर आज (दि. १८) होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. कराड याचे वकील ॲड. कवडे यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांनी पुढील तारखेची मागणी केली होती. त्यामुळे आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आले असून पुढील सुनावणी २० जानेवारी होणार आहे, असे सरकारी वकील ॲड. जितेंद्र शिंदे यांनी सांगितले.
या बाबतची माहिती अशी की, संतोष देशमुख प्रकरणी आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला वाल्मीक कराड यांच्या जामीन अर्जावर आज केज येथील क स्तर दिवाणी न्यायालयात न्यायाधिश एस. व्ही.पावसकर यांच्या समोर सुनावणी होणार होती. दरम्यान, वाल्मीक कराड यांचे वकील ॲड. कवडे यांनी न्यायालयासमोर अर्ज सादर केला की, आज त्यांची प्रकृती ठीक नसल्याने पुढील तारीख वाढवून मिळण्यात यावी.
त्यानुसार न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर केला आहे. पुढील सुनावणी २० जानेवारीरोजी होणार आहे. या वेळी सरकारी पक्षाचे वकील ॲड. जितेंद्र शिंदे न्यायालयात हजर होते. त्यामुळे केज येथील न्यायालयात वाल्मीक कराड यांच्या जामीन अर्जावर होणारी सुनावणी तूर्त टळली आहे.