केज : संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा मागील सहा महिन्यापूर्वी तीनदा त्याच्या गावी येऊन गेल्याचा खळबळजनक दावा संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केला आहे. तसेच त्यांनी पोलीस यंत्रणेच्या तपासावर देखील संशय व्यक्त केला आहे.
२१ फेब्रुवारी रोजी बीड येथील विशेष न्यायालयात बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. यावेळी न्यायालयाच्या परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे म्हणाले की, संतोष देशमुख हत्याकांडातील फरार असलेला आणि तपास यंत्रणेला चकवा देत असलेला फरार आरोपी हा तीन वेळेस त्याच्या धारूर तालुक्यातील मैंदवाडी या गावात येऊन गेला आहे. या आरोपीपासून देशमुख कुटुंबियांच्या जीविताला धोका असून तो क्रूर आहे, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कृष्णा आंधळे हा मोबाईल वापरत नसल्याने त्याचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. त्याला तत्काळ अटक करून त्याची धिंड काढण्याची मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. हे आरोपी सैतानी प्रवृत्तीचे असून तो तीन वेळा गावी आला असल्याची माहिती त्यांनी तपास यंत्रणेला दिली असल्याची माहिती देखील दिली आहे. या प्रकारामुळे धनंजय देशमुख यांनी पोलिस यंत्रणेवर देखील संशय व्यक्त केला आहे. तसेच त्याला समर्थन देणारे देखील तेवढेच क्रूर आणि सैतानी प्रवृत्तीचे असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान धनंजय देशमुख यांच्या या खळबळजनक दाव्यामुळे पोलिसांसह तपास यंत्रणेवर प्रश्न चिन्ह उपस्थित जात आहे.